Mon, Aug 19, 2019 06:57होमपेज › Konkan › खोट्या सहीने काढले साडेसहा लाखांचे कर्ज

खोट्या सहीने काढले साडेसहा लाखांचे कर्ज

Published On: Jun 27 2018 1:20AM | Last Updated: Jun 26 2018 11:17PMदेवरुख : वार्ताहर 

देवरूखातील बहुचर्चित असलेल्या ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत कथित अपहाराबाबत आता दुसरी तक्रार दाखल झाली आहे. खोटी सही करून ठेवीवर कर्ज काढून आपली फसवणूक केल्याची तक्रार विजय मुुरलीधर ढोल्ये यांनी देवरूख पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याकरिता हस्ताक्षर तज्ज्ञांकडून स्वाक्षरीची पडताळणी केली जाणार आहे. यामुळे प्रकरणातील सत्य लवकरच उघड होणार आहे.

देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार ओंकार पतसंस्थेत विजय ढोल्ये (71 वर्षे) हे सदस्य असून ठेवीदारदेखील आहेत. त्यांच्या नावावर 6 लाख 50 हजार रूपयांचे बनावट कर्ज करण्यात आल्याचे दिलेल्या फिर्यादीत ढोल्ये यांनी नमूद केले आहे. हा प्रकार 23 मार्च 2015 रोजी घडला. पतसंस्थेच्या तत्कालीन व्यवस्थापिका यांनी बनावट कर्ज प्रकरण करून आपली खोटी सही करून ही रक्‍कम परस्पर हडप केली, यामध्ये तत्कालीन संचालक सामील असल्याचा आरोपही ढोल्ये यांनी केला आहे. 

यावरून तत्कालीन सहाय्यक व्यवस्थापिका व संचालक मंडळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवरूख पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ढोल्ये आपली ठेव परत मागण्याकरिता गेले असता, त्यांना तुमच्यावर कर्ज असल्याचे सांगण्यात आले. मात्र, यावेळी  ढोल्ये यांनी आपण कोणतेही कर्ज काढले नसल्याचे सांगितले. याबाबत ढोल्ये यांनी अधिक माहिती मिळवली असता, त्यांच्या ठेवीवर तब्बल 6 लाख 50 हजार रूपयांचे कर्ज बनावट स्वाक्षरी करून काढल्याची धक्‍कादायक बाब पुढे आली.

या प्रकरणाचा तपास देवरूख पोलिस करीत असून हस्ताक्षर तज्ज्ञांच्या अहवालानंतर यातील गौडबंगालामागील उकल होणार असल्याचे येथील पोलिस निरीक्षक पाटील यांनी सांगितले आहे. ओंकार पतसंस्थेमध्ये तीन वर्षांपूर्वी हा अपहार झाला होता. या पतसंस्थेत या पूर्वीही सुमारे 2 कोटी 50 लाख रूपयांचा अपहार चांगलाच गाजला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणी कसून चौकशी करण्यात आली.दरम्यान, आधीच्या अपहारात तत्कालीन व्यवस्थापिकेला पोलिस कोठडी देखील झाली होती. या प्रकरणी तिची चौकशी केल्यानंतर पतसंस्थेच्या काही संचालकांनाही न्यायालयीन कस्टडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. नव्याने दाखल झालेल्या या तक्रारीमुळे ओंकार पतसंस्थेचा घोटाळ्याचा विषय देवरुख शहरात चर्चेचा बनला असून ठेवीदारांनी चिंता व्यक्‍त केली आहे.