होमपेज › Konkan › ‘सेटिंग’च्या खेळात कोकणातील गुणवत्ता दडपतेय : नीलेश राणे

‘सेटिंग’च्या खेळात कोकणातील गुणवत्ता दडपतेय : राणे

Published On: Feb 24 2018 9:24PM | Last Updated: Feb 24 2018 9:12PM



चिपळूण : प्रतिनिधी

कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत विविध पदांसाठी होणार्‍या भरती प्रक्रियेमध्ये स्थानिक तरूणांना प्राधान्य मिळायला हवे. स्थानिकांच्या हक्‍काची भाकरी हिरावून घेण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्षे होत आहे. पुढील काळात असे धाडस होता कामा नये, अशी रोखठोक भूमिका माजी खासदार व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस नीलेश राणे यांनी ‘पुढारी’शी बोलताना स्पष्ट केली.

कोकणात स्थानिक पदांसाठी शासकीय भरती प्रक्रिया सुरू असते. मात्र, या भरती प्रक्रियेमध्ये परजिल्ह्यांतील तरूण मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. त्यांना याच जिल्ह्यात सेवेत असलेले परजिल्ह्यांतील अधिकार्‍यांचे संरक्षण व मार्गदर्शन मिळते. त्यामुळे भरती प्रक्रियेत स्थानिक तरूण मागे पडतो. परजिल्ह्यांतील तरूण मग थोडीफार सेवा झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यांत परततो. त्यातून पुन्हा या जिल्ह्यामध्येच जागा रिक्‍त होतात व पुन्हा ती जागा पटकविण्यासाठी परजिल्ह्यांतील तरूणच हजर असतात. ही भरती प्रक्रिया यापुढे चालणार नाही. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला एम्प्‍लॉयमेंट एक्सचेंज समजले जाते आहे, असा संतप्‍त सवाल त्यांनी व्यक्‍त केला. 

कोकणातील या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पोलिस, ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, जि. प.तील विविध पदांसाठी स्थानिक तरूण गुणवत्ता असूनही मागे पडतो. यापुढे दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक भरतीमध्ये स्थानिक तरूणांनाच प्राधान्य द्यायला हवे. दोन्ही जिल्ह्यांतील प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
या भरती प्रक्रिया म्हणजे स्थानिक तरूणांच्या हक्‍काची भाकरी आहे. एकतर कोकणात बेरोजगारांची संख्या मोठी आहे. आर्थिक स्त्रोत नसल्याने उद्योग, व्यवसायात कोकणातील तरूण अपवाद वगळता धाडस करीत नाही, अशी उदाहरणे आहेत. किमान नोकर भरतीत तरी या तरूणांना प्राधान्य मिळायला हवे. 

राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये उद्योग, व्यवसाय व सहकाराचे जाळे आहे. त्यामुळे तेथील तरूणाकडे पर्याय आहे. स्थानिक नोकर भरतीत निराश झाल्याने हा तरूण मग मुंबईत जातो. मुंबईत रोजंदारीकडे वळतो. या उलट परजिल्ह्यांतील तरूण भरती झाल्यानंतर पुन्हा बदली घेऊन आपापल्या गावाकडे जातात. त्यामुळे कोकणात आर्थिक उलाढालही मर्यादित राहते. या दोन्ही जिल्ह्यांतील तरूण पर्यटन व अन्य माध्यमांतून स्वयंरोजगारासाठी आता कुठे पुढाकार घेत असला तरी नोकर भरतीतही त्याचा हक्‍क त्याला मिळायला हवा. म्हणून या पुढील काळात मात्र स्थानिकांना भरतीत प्राधान्य हा स्पष्ट अजेंडा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा असणार आहे. प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू. पण स्थानिकांचे हित जपले जाईल, असा स्पष्ट निर्वाळा त्यांनी यावेळी दिला.

... तर सरकारने धोरण बदलावे!

परजिल्ह्यांतील तरूणांच्या तुलनेत कोकणातील तरूण अन्य जिल्ह्यांतील भरती प्रक्रियेत सहभागी होत नाही. कोकणातील तरूणांनी गुणवत्तेच्या जोरावर नोकरी मिळविण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा ओलांडायला हव्यात. असे असले तरी सरकारच्या विविध पदांसाठीच्या भरती निवड प्रक्रिया त्या-त्या जिल्ह्यात राबविताना त्या-त्या जिल्ह्यातील स्थानिकांना प्राधान्य देण्याचे धोरण शासनाने ठेवायला हवे. स्थानिकांना आपली हक्‍काची भाकरी मिळेल. शिवाय त्या-त्या जिल्ह्यातील सामाजिक व विकासाच्या प्रश्‍नांचा स्थानिकांनाच अधिक अभ्यास असतो. त्याचाही फायदा प्रशासनाला होऊ शकतो. यातून स्थानिक जनतेशी अधिक सुसंवाद राहू शकेल. यामुळे भविष्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये भरती प्रक्रियेत स्थानिक तरूणांनाच प्राधान्य द्यायला हवे. यासाठी आपण सरकारकडे आग्रह धरणार असल्याचेही नीलेश राणे यांनी सांगितले.