Sun, Jun 16, 2019 02:51होमपेज › Konkan › मुद्रा व स्टार्टअप योजनेतून महिलांना कर्ज : संतोष राणे

मुद्रा व स्टार्टअप योजनेतून महिलांना कर्ज : संतोष राणे

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 16 2018 10:54PMकुडाळ : शहर वार्ताहर

महिलांमध्ये उपजतच उद्यमशीलता गुण असतो. त्यामुळे उद्योजकता विकास कार्यक्रमाचा खरा लाभ घेणार असतील तर त्या महिलाच असतील. त्यांच्या प्रामाणिक आणि कष्टाळू वृत्तीमुळेच त्या व्यवसायात यशस्वी होतील यात शंका नाही, असा आशावाद युनियन बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी संतोष राणे यांनी व्यक्‍त केला.

जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग व असोसिएशन ऑफ लेडी इंटरप्रेनर्स ऑफ  इंडिया बेंगलोर यांच्या संयुक्‍त विद्यमाने व गोदरेज अ‍ॅण्ड बॉयज मॅन्युफॅक्‍चरिंग कंपनी लि. अर्थसहाय्यीत उद्योजकता विकास कार्यक्रमाचे कुडाळ येथे आयोजन करण्यात आले. त्यावेळी श्री. राणे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. अलिप संस्थेचे व्ही. जी. राजेंद्रप्रसाद, प्रकल्प संचालक अलिप, नकुल पार्सेकर, व्यवस्थापकीय  समिती सदस्य मिलिंद प्रधान, एचआर मॅनेजर गोदरेज कंपनी, विजय सारथी तसेच जनशिक्षणचे अधिकारी उपस्थित होते. 

संतोष राणे म्हणाले, महिला आत्मनिर्भर व्हाव्यात या उद्देशाने  कर्ज दिले जाते. प्रधानमंत्री मुद्रा योजना, स्टार्ट अप योजना याद्वारे महिलांना व्यवसायासाठी कर्जे दिली जातात. आगामी काळात नोकर्‍यांची संधी फार कमी असल्याने उद्योगामध्ये  लोकांना आपले भविष्य घडवावे लागणार आहे. त्यादृष्टीने महिलांनी आपली मानसिकता बदलून आलेल्या या संधीचा फायदा करून आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले.