Tue, Apr 23, 2019 00:15होमपेज › Konkan › जिल्हा काँग्रेस ‘हात’घाईवर

जिल्हा काँग्रेस ‘हात’घाईवर

Published On: Sep 03 2018 1:39AM | Last Updated: Sep 02 2018 9:12PMचिपळूण : शहर वार्ताहर

काँग्रेस पक्षाचे माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांच्यावर टीकेची झोड उठवली. जिल्ह्यातील पक्ष संपविण्यास कीर यांचाच हात असल्याचा आरोप करीत त्यांनी घरचा आहेर दिला. तर जिल्हाध्यक्ष रमेश कदम हे केवळ नामधारी असून रमेश कीर हेच खरे पक्ष संपविण्याचे राजकीय सूत्रधार असल्याचा आरोप शाह यांनी केला.

माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी सांगितले की, माजी आ. रमेश कदम यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यानंतर जिल्ह्यात पक्ष नव्याने उभारी घेईल, अशी अपेक्षा होती. त्यादृष्टीने कदम यांनी सुरुवातीला काम केले. मात्र, माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांचे पक्षाच्या प्रदेश पातळीवर वर्चस्व असल्याने तेच खरे पडद्यामागील जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हलवित आहेत. त्यामुळे रमेश कदम यांना मिळालेल्या पदावर काम करण्याची पाहिजे तशी संधी मिळत नाही. कदम हे केवळ नामधारी जिल्हाध्यक्ष आहेत, तर कीर हे जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांना ते चुकीची माहिती देत आहेत. जिल्ह्यात काँग्रेसची ताकद नाही, ती कधीही वाढणार नाही असे प्रदेश पातळीवरील नेत्यांना कीर हे भासवित असतात. 

गेल्या पंधरा वर्षांत कीर यांच्या या वृत्तीमुळे पक्ष बळकट झाला नाही. पक्षबांधणीसाठी गेल्या पंधरा वर्षांपासून कीर यांच्याकडून दिली जाणारी कार्यकारिणीची जुनी छापील यादी पुन्हा नव्याने प्रदेश पातळीवर दिली जाते. याही वेळेस रमेश कदम यांनी जिल्हा कार्यकारिणी प्रदेश पातळीवर मंजुरीसाठी पाठविली आहे त्यामध्ये कीर यांचीच छाप आहे. त्यामध्ये बहुतांश सदस्य जुन्या कार्यकारिणीतीलच आहेत. अशा पद्धतीने कार्यकारिणीची बांधणी केल्यास पक्ष बळकट होणार नाही. कीर हे स्वत:च्या स्वार्थासाठी पक्षाचा वापर करीत आहेत. रमेश कदमांवर दबाव टाकून  कीर पडद्यामागून सूत्रे हलवित आहेत. त्यामुळे कदम हे नामधारी जिल्हाध्यक्ष असून कीर यांच्या हातातील बाहुले बनले आहेत, असा आरोप शाह यांनी केला.  

या सर्वाबाबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, जिल्हा प्रभारी विश्‍वनाथ पाटील यांची भेट घेऊन वस्तूस्थिती निदर्शनास आणण्यात आली आहे. जिल्ह्यातील पुढील निर्णय चव्हाण व पाटील हेच घेणार असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले. यावेळी दीपक निवाते, नीलेश चव्हाण उपस्थित होते.