Thu, Jul 18, 2019 10:12होमपेज › Konkan › नळाच्या पाण्यातून येताहेत जीवजंतू

नळाच्या पाण्यातून येताहेत जीवजंतू

Published On: Aug 27 2018 10:15PM | Last Updated: Aug 27 2018 9:32PMदेवरूख : प्रतिनिधी

शहरातील मुस्लिम मोहल्ल्यात गेल्या आठ दिवसांपासून नळातून जीवजंतू येत असल्याचे आढळून आले आहेत. नगरपंचायतीला कळवून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला धारेवर धरले. गेल्या आठ दिवसांपासून मुस्लिम मोहल्‍ला येथील नगरपंचायत नळपाणी योजनेच्या नळातून जीवजंतू येत असल्याचे प्रकार सुरु आहे. याबाबत महिलांनी नगरपंचायतीला कळविले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. 

या मोहल्ल्यातील महिलांनी हा प्रकार पंचायत समिती उपसभापती अजित गवाणकर यांच्या कानावर घातला. यानंतर शिवसैनिक व नगरसेवकांना घेऊन गवाणकर यांनी या परिसरात भेट देत पाहणी केली. यावेळी प्रत्येकाच्या घरात पाण्यांमध्ये लहान-लहान जीवजंतू असल्याचे दिसून आले. यावेळी नगरसेवक वैभव पवार, निदा कापडी, माजी पं. स. सभापती बंड्या बोरुकर, मुन्‍ना थरवळ, अजित भोसले आदी उपस्थित होते. 

यावेळी गेले आठ दिवस असे पाणी येत असल्याचे या महिलांनी सांगितले. याबाबत नगरपंचायतीला कळविण्यात आले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केला गेला आहे. कळवूनही आठ दिवसांत एकही कर्मचारी आला नाही. याबाबत नाराजी व्यक्‍त करण्यात आली. 

शेवटी उपस्थित शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला धारेवर धरत प्रत्यक्ष जाग्यावर कर्मचार्‍यांना बोलावले. त्यांना कडक शब्दांत यावेळी सुनावण्यात आले. हे दूषित पाणी तात्काळ बंद करुन टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. स्वच्छ पाणी मिळाले नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.