होमपेज › Konkan › लिंगायत महासंघाचे उपोषण स्थगित

लिंगायत महासंघाचे उपोषण स्थगित

Published On: Mar 03 2018 1:49AM | Last Updated: Mar 02 2018 8:32PMखेड : प्रतिनिधी

तालुक्यातील ऐनवली गावातील अंकिता जंगम हिचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्यानंतर अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाने या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करत दि.19 फेब्रुवारी रोजी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते. याप्रकरणी शिवसेनेचे युवा नेतृत्व योगेश कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत वीरशैव लिंगायत महासंघाचे म्हणणे पोचवले. त्यामुळे गुरूवारी महासंघाचे कार्यकर्ते व अंकिताचे आई-वडील यांनी बेमुदत साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करत असल्याचे जाहीर केले.

यावेळी योगेश कदम, प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने, पोलिस निरीक्षक डॅनियल बेन, लिंगायत महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ.विजय स्वामी यावेळी उपस्थित होते. तालुक्यातील ऐनवली गावातील अंकिता जंगम या मुलीच्या मृत्यूचे गुढ वाढले असून खेड पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. सोमवार दि.19 रोजी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघातर्फे खेडचे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवावा व त्यांना अटक करावी, अशी मागणी करत बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते.

खेड तालुक्यातील ऐनवली गावातील रहिवासी असलेल्या अंकिता जंगम हिचा मृतदेह कुडोशी गावानजीक पेंढरीच्या पुलाखालील नदीपात्रात ती बेपत्ता झाल्यानंतर तिसर्‍या दिवशी सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी अंकिताच्या नातेवाईकांनी व्यक्‍त तिचा घातपात झाला असल्याची शंका व्यक्‍त करत संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करून काही जणांविरोधात अंकिताला आत्महत्येस प्रवृत्त करून तिचा मृत्यू झाला आहे हे माहिती असतानादेखील प्रकार लपवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

परंतु, याप्रकरणी पोलिसांनी अद्याप खुनाचा गुन्हा दाखल केलेला नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार याप्रकरणी अंकिता हिच्या प्राप्त शवविच्छेदन अहवाल व तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यांच्या प्राप्त अहवालात तिचा घातपात झाल्याचे स्पष्ट होत नाही. परंतु, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघातर्फे याबाबत काही दिवसांपूर्वीच अनेक मुद्दे उपस्थित करत खुनाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी लावून धरली आहे.

अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे अध्यक्ष विष्णू जंगम, कार्याध्यक्ष तथा प्रवक्‍ते डॉ.विजय जंगम, महासचिव अजित जंगम, कोषाध्यक्ष प्रकाश जंगम, अंकिताचे वडील सुनील जंगम, सदानंद जंगम यांच्यासह समाजाचे राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वीरशैव माहेश्‍वर मंडळ खेड, सर्व जंगम समाज संघटना, ऐनवली ग्रामस्थांना सोबत घेऊन सोमवार दि.19 रोजी खेड उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले  साखळी उपोषण सलग 11 दिवस सुरू राहिले. अंकिताच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई व्हावी, यासाठी राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव, संजय कदम, भाजपचे उत्तर रत्नागिरी प्रभारी शशिकांत चव्हाण यांनीदेखील सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले होते.

याप्रकरणी अंकिता जंगम हिचे आई-वडील यांनी शिवसेना नेते रामदास कदम व युवा नेते योगेश कदम यांची भेट घेऊन त्यांना देखील यापूर्वी निवेदन दिले होते. याप्रकरणी योगेश कदम यांनी पाठपुरावा करून पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या माध्यमातून अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे पदाधिकारी व अंकिताचे आई-वडील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भेट घडवून आणली. यावेळी ना.फडणवीस यांनी अंकिताच्या मृत्यूप्रकरणी सीआयडी चौकशीच्या सूचना केल्या. याबाबतची माहिती गुरूवार दि.2 फेब्रुवारी रोजी उपोषणस्थळी पोहोचून युवा नेते योगेश कदम यांनी दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना पाठवलेल्या पत्राची प्रत उपोषणकर्त्यांना दिली. त्यानंतर उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा जंगम यांनी केली.