Tue, Jul 16, 2019 22:42होमपेज › Konkan › परवानाधारक पर्ससीन नौकांची होणार तपासणी

परवानाधारक पर्ससीन नौकांची होणार तपासणी

Published On: Aug 21 2018 1:37AM | Last Updated: Aug 20 2018 10:25PMमालवण : प्रतिनिधी

जिल्ह्याच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत पर्ससीन मासेमारी सुरू असल्याची माहिती पारंपारिक मच्छीमारांनी दिली आहे. त्यामुळे मत्स्य विभागाने जिल्ह्यातील परवाने दिलेल्या 43 पर्ससीन नौकांची तपासणी करावी. या तपासणीचा कारवाई अहवाल तहसील कार्यालयात सादर करावा, असा आदेश तहसीलदार समीर घारे यांनी मत्स्य व्यवसाय कार्यालयास देताना अनधिकृत व बेकायदेशीर मासेमारीवर कडक कारवाईचे धोरण अवलंबणार असल्याचे स्पष्ट केले.

मालवण तहसीलदार कार्यालय येथे अनधिकृत पर्ससीन मासेमारी रोखण्याबाबत बैठक तहसीलदार घारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्‍त राजकुमार महाडिक, बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, रविकिरण तोरसकर, बाबी जोगी यांच्यासह आचरा पोलिस ठाण्याचे कर्मचारी व मच्छीमार उपस्थित होते. 

मच्छीमारांनी प्रशासनाकडे विविध सूचना मांडल्या. यावर तहसीलदार घारे यांनी मत्स्य विभागाला अनधिकृत मासेमारीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. प्रशासनाने कारवाई करण्यासाठी एकमेकांकडे बोट न दाखवता आपल्या अधिकारात कारवाई करावी, असेही बजावले. मच्छीमारांनी पर्ससीनची मासळी उतरण्यासाठी विजयदुर्ग येथे एकमेव लँडिंग पॉईंट असताना सर्जेकोट व मालवण बंदरात मासळी उतरली जाते. यावर पोलिस निरीक्षकांनी पहिला पुरावा द्या, त्यांनतर कारवाई करू, असे सांगितले. 

मच्छीमार बांधव प्रशासनाच्या बाजूने राहिले तरच प्रशासन मच्छीमारांच्या बाजूने राहील. आगामी मत्स्य हंगामात स्थानिक मच्छीमारांनी खबरदारी घेऊन संशयास्पद किंवा अनधिकृत मासेमारी करताना नौका आढळून आल्यास आम्हाला माहिती द्यावी. अनुचित प्रकार रोखण्यासाठी मच्छीमारांनी प्रशासनास सहकार्य करावे. कायदेशीर मार्गाने अनधिकृत नौकांवर कारवाई झाल्यास त्यांचा चांगला संदेश राज्यात जाईल व त्याचा फायदा मच्छीमाराना होईल, असा विश्‍वासही समीर घारे यांनी व्यक्‍त केला.

बैठकीत मच्छीमारांनी सर्जेकोट बंदरात बेवारस स्थितीत तीन पर्ससीन नौका असल्याची माहिती दिली. यावेळी तहसीलदार समीर घारे व पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी तात्काळ ‘अ‍ॅक्शन’ घेत मत्स्य विभागाच्या अधिकार्‍यांना त्या नौकांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या. त्यासाठी पोलिस बंदोबस्त तसेच महसूलकडून मंडळ अधिकारी पाठविण्यात आले. बैठक संपल्यानंतर मत्स्य व्यवसाय आयुक्‍त कारवाईसाठी सर्जेकोट येथे रवाना झाले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत कारवाईबाबतचा संदेश पोलिस व तहसील प्रशासनास प्राप्त झाला नव्हता.

अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी शासनाने स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन करावा, अशी मागणी मच्छीमारांची असताना त्यावर अद्याप शासनाकडून काहीच कार्यवाही झाली नाही, असे मच्छीमारांनी सांगितले. यावेळी तहसीलदार घारे यांनी मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने आपल्याकडे स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापनेबाबत मागणीपत्र द्यावे. त्याचा पाठपुरावा करण्यासाठीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करू, असेही त्यांनी सांगितले.