Sat, Jul 20, 2019 15:02होमपेज › Konkan › दोन वेळच्या जेवणाएवढे तरी वेतन द्या!

दोन वेळच्या जेवणाएवढे तरी वेतन द्या!

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 16 2018 10:44PMपणदूर : प्रकाश चव्हाण

सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचार्‍यांना दोन वेळचे जेवण मिळेल, एवढे तरी  वेतन  शासनाने द्यावे, असे भावनिक आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक  ग्रंथालय कर्मचारी संघाने वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्याकडे  लेखी निवेदनाद्वारे केले आहे.

सावंतवाडी येथे भाजपच्या मेळाव्यासाठी आलेले ना. सुधीर मुनगंटीवर यांना हे निवेदन  सादर करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक  ग्रंथालय कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष संजय शिंदे , महेंद्र पाटील, अनिल शिवडावकर, जयेंद्र तळेकर, पुनम नाईक, वाडेकर आदी उपस्थित होते.या निवेदनात कर्मचार्‍यांच्या मागण्या व  पुढील आंदोलनासंदर्भात शासनाला इशारा देण्यात आला आहे. शासन राज्यातील  सार्वजनिक ग्रंथालय चळवळ व त्यात काम करणार्‍या कर्मचार्‍यांकडे अनेक सनदशीर आंदोलने करूनही गांभीर्याने पहात नसल्याने अखेरचे व निर्णायक आंदोलनाचा एक भाग म्हणून  17 फेब्रुवारी 2018 पूर्वी ग्रंथालये व कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्‍न न सुटल्यास सोलापूर  येथे होणार्‍या संघाच्या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये राज्यातील  शासन पुरस्कृत  ग्रंथमित्र आपले राज्यस्तरीय व विभागस्तरीय ग्रंथमित्र  पुरस्कार शासनास परत करणार आहेत.

शासनाने ग्रंथालय चळवळ डिजिटल करावयाचे धोरण आखले आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करून सुरुवातही करण्यात आली आहे. मात्र, ग्रंथालय सेवकांच्या जीवन मरणाचा प्रश्‍न म्हणजेच त्यांचे निर्वाह वेतन याबाबत कोणतीही तरतूद  अद्यापपर्यंत केलेली नाही, असे निवेदनात पुढे म्हटले असून  आपल्या वित्त विभागाकडून ग्रंथालयाच्या अनुदान वाढीची फाईल उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे परत आल्याचे कळते. त्यामुळे  राज्यातील ग्रंथालय कर्मचार्‍यांच्या छातीचा ठोका पुन्हा एकदा चुकलेला आहे असे पुढे म्हटले आहे. आपण राज्याचे वित्तमंत्री आहात. आपल्याला ग्रंथालय कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नाबाबत पूर्ण माहिती आहे. राज्यातील ग्रंथालय कर्मचारी आत्महत्या करू लागलेला आहे. तेव्हा यावेळच्या अर्थसंकल्पात ग्रंथालय कर्मचार्‍यांना दोन वेळचे  जेवण मिळेल एवढे तरी वेतन मिळावे अशी तरतूद  करावी, असे शेवटी  भावनिक आवाहन करण्यात आले.