होमपेज › Konkan › जिल्ह्यात लेप्टोचे आढळले  १५ रुग्ण; सर्वाधिक चिपळुणात

जिल्ह्यात लेप्टोचे आढळले  १५ रुग्ण; सर्वाधिक चिपळुणात

Published On: Aug 02 2018 1:59AM | Last Updated: Aug 01 2018 11:56PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यात लेप्टोबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत लेप्टोचे 15 रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर योग्य वेळीच उपचार झाल्याने आतापर्यंत एकही रुग्ण मृत पावलेला नाही.

जिल्ह्यात जानेवारीपासून लेप्टोचे 70 संशयित रुग्ण जिल्ह्यात सापडले आहेत. यापैकी 15 जणांना लेप्टोची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. लेप्टोचे सर्वाधिक सात रुग्ण रत्नागिरी तालुक्यात आढळून आले आहे. चिपळूण तालुक्यात सर्वाधिक 31 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. परंतु, यातील 1 रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे.  

लेप्टो हा तापाचा आजार उंदीर, डुक्‍कर व कुत्रा या प्राण्यात आढळतो. आजार झालेल्या प्राण्यांच्या लघवीतले जंतू सांडपाण्यात बरेच दिवस तग धरू शकतात. या दूषित सांडपाण्याचा त्वचेशी किंवा तोंडावाटे संबंध आला तर माणसालाही हा संसर्ग होऊ शकतो. पावसाळ्यामध्ये त्याचा अधिक प्रसार होतो. काही रुग्णांना पायाला झालेल्या जखमा किंवा अन्य माध्यमातून विष्ठेतील विषाणू माणसाच्या शरीरात जातात आणि त्या माणसाला लेप्टोचा संसर्ग होतो. 

जिल्हा आरोग्य विभागाने लेप्टोवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याने कोणताही रुग्ण दगावलेला नाही. हा आजार अस्वच्छतेने पसरतो. त्यामुळे डुकरे, मोकाट कुत्री, उंदीर यांचा बंदोबस्त करून लेप्टो रोगाला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.