Thu, Jun 20, 2019 14:41होमपेज › Konkan › कोंडुरा येथे दुचाकीस्वारांवर बिबट्याचा हल्ला

कोंडुरा येथे दुचाकीस्वारांवर बिबट्याचा हल्ला

Published On: Dec 23 2017 2:07AM | Last Updated: Dec 22 2017 8:37PM

बुकमार्क करा

मडुरा : वार्ताहर

पाडलोस-केणीवाडा येथे भरवस्तीत बिबट्याने दर्शन दिल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री कामावरून घरी परतत असणार्‍या कोंडुरा हायस्कूलजवळ दोन दुचाकीस्वारांवर बिबट्याने अचानक हल्ला केला. परंतु त्यांनी दाखविलेल्या धाडसामुळे बिबट्याने पळ काढला. 

सावंतवाडी तालुक्यात विशेषतः ग्रामीण भागात वन्यप्राण्यांकडून धाक निर्माण होण्याचे प्रकार सुरू आहेत. आरोस, सातोसे, साटेली, कोंडुरा, न्हावेली, दांडेली, पाडलोस, मडुरा, शेर्ले परिसरात बिबट्याचे प्रमाण वाढले आहे. भक्ष्याच्या शोधात बिबट्या भरवस्तीपर्यंत येतो, परंतु बुधवारी रात्री पाडलोस येथील अमोल नाईक व मडुरा येथील नितीन खर्डे हे कामावरून आपल्या दुचाकीने घरी येत होते. कोंडुरा हायस्कूलजवळ असलेल्या उतरणीवर अचानक बिबट्याने त्यांच्या दुचाकीसमोर झेप घेतली. दुचाकीचालक अमोल नाईक यांनी त्या बिबट्याला हेरल्याने त्यांनी आपला तोल सांभाळला. त्याचक्षणी पाठीमागे बसलेल्या नितीन खर्डे यांनी काठीची धाक दाखवून व गाडीचा हॉर्न वाजवून त्या दोघांनी बिबट्याला पळवून लावण्यात यश मिळविले व आपले प्राण वाचविले. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून आरोस, सातार्डा, कोंडुरा, दांडेली, न्हावेली-रेवटेवाडी, पाडलोस, मडुरा रेल्वे स्टेशन, शेर्ले-तामाळघाटी येथे बिबट्या वाघाचे दर्शन होत आहे. वनविभागाने याची दखल घेवून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी प्रवासी, वाहनचालक, ग्रामस्थांमधून होत आहे. तसेच गवा रेड्यांचेही दर्शन रात्रीच्यावेळी भर रस्त्यात होत असून वाहनचालकांसह प्रवाशांच्या जीवितास धोका असल्याने यासंदर्भात येत्या दोन दिवसांत सावंतवाडी वनविभाग कार्यालयाला निवेदन देणार असल्याचे अमोल नाईक यांनी सांगितले.