Thu, May 23, 2019 14:23
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › विधान परिषद निवडणूक प्रतिष्ठेची

विधान परिषद निवडणूक प्रतिष्ठेची

Published On: May 09 2018 2:04AM | Last Updated: May 08 2018 10:55PMरत्नागिरी : भालचंद्र नाचणकर

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना खा. अनंत गीते यांनी शिफारस केलेला उमेदवार पक्षाने मान्य केला आहे. त्यामुळे गेल्या 28 वर्षांच्या त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. परिणामी प्रथमच त्यांनी लोकसभा वगळता अशा एखाद्या निवडणुकीत सक्रिय रस घेतला आहे. सभ्य राजकारण करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. अशा नेत्याला या निवडणुकीतील मतदार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिवसेनेच्या सदस्यांना 4 ते 5 दिवस अज्ञात स्थळाची सफर करण्याची तयारी ठेवा, असे तालुकानिहाय बैठकीत सांगावे लागत आहे.

शिवसेनेचे खा. अनंत गीते सुमारे 28 वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात आले. लोकसभा उमेदवार म्हणूनच त्यांची जिल्ह्यात एन्ट्री झाली. तेव्हापासून विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, विधान परिषद, ग्रामपंचायतींच्या अनेक निवडणुका झाल्या. यातील एकाही निवडणुकीत त्यांनी आत्ताच्या विधान परिषदेच्या निवडणुकीप्रमाणे कृतिशील सहभाग घेतला नव्हता. त्या-त्या स्थानिक स्तरावरची नेतेमंडळी आपल्यापरीने पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी झटत राहिली. त्यांनी खासदारकीची निवडणूक वगळता फारसे लक्ष घातले नव्हते. त्यांचे आत्तापर्यंतचे राजकारण सभ्य राजकारण हे सर्वांनीच अनुभवले आहे.

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने चित्र थोडेसे बदलल्याचे दिसत आहे. या निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार अ‍ॅड. साबळे यांच्या उमेदवारीसाठी ना. गीते यांनी पक्षाकडे शिफारस केली. पक्षाने ही शिफारस मान्य केल्याने विजयाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. त्यामुळे त्यांनी ज्या प्रकारचे ‘कष्ट’ स्वत:च्या लोकसभा निवडणुकीत घेतले नाहीत त्यापेक्षा अधिक ‘मेहनत’ घ्यावी लागत आहे. पर्यायाने त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्याचाच परिणाम म्हणून  स्वत: मतदार असलेल्या सेना सदस्यांच्या बैठका घेतल्या. यावेळी त्या सदस्यांना मतदानापूर्वीचे 4-5 दिवस राखून ठेवा. सफरीला जावे लागणार आहे. त्यावेळी काही कारणे चालणार नाहीत, असे सांगावे लागले.