Thu, Jun 27, 2019 02:30होमपेज › Konkan › #Women’sDayमिळून सार्‍या जणी...

#Women’sDayमिळून सार्‍या जणी...

Published On: Mar 07 2018 10:43PM | Last Updated: Mar 07 2018 10:43PMगेल्या काही वर्षांपूर्वी कोकणात मनीऑर्डरवर चालणारे अर्थशास्त्र  होते. सर्वच क्षेत्रात पुरुषी वर्चस्व होते. अशा काळातही काही मोजक्या महिलांनी राजकीय क्षेत्रात आपला  वेगळा ठसा उमटवला होता. यामध्ये कुसमुताई अभ्यंकर, मामी भुवड ही नावे प्राधान्याने अधोरेखित करावी लागतील. मात्र, आता महिलांना 50 टक्के आरक्षण मिळाल्यानंतर राजकीय क्षेत्राबरोबरच अन्य क्षेत्रेही पादाक्रांत केली. त्यामुळे काल, आज आणि उद्याही  मिळून सार्‍याजणींनी कोकणचे विश्‍व व्यापायला सुरुवात केली आहे.

कोकणातील महिलांनी उभारलेल्या कार्याचा वारसा घेऊन आज अनेक युवती वाटचाल करीत आहेत. काळानुसार महिलांच्या कर्तृत्वाला अनेक क्षेत्र खुणावत आहेत. आधुनिक काळात अनुसुरून वेगवेगळ्या क्षेत्रात मुली कर्तृत्व गाजवत आहेत. 

आता या महिला राजकारणातील दीपस्तंभ ठरल्या आहेत. संगीत आणि अभिनयातही कोकणातील अनेक महिला आघाडीवर आहेत. अनुया बाम, अक्षता भोळे यांनी अभिनयात तर सौ. मुग्धा भट- सामंत, प्रेरणा दामले, शमिका भिडे, रसिका गानू यांनी गायनात कोकणाचे नाव उज्ज्वल केले आहे. मिताली भिडे यांनी नृत्यात मिळवलेले यश कोकणाबाहेरही सिद्ध झाले आहे. प्रत्येक परीक्षांमध्ये मुलांपेक्षा मुलीच अधिक गुणवंत ठरल्या आहेत. वैद्यकीय, वकिली व्यवसायतही महिलांनी भरारी घेतली आहे. शिक्षकी क्षेत्रात महिलांचे प्राबल्य आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पहिली महिला सीए होण्याचा मान कला निंबरे यांनी मिळवला होता. त्यानंतर अनेक मुली कोकणातून सीए झाल्या. ही वाटचाल आजही कायम आहे. मैत्रेयी राजपूत हिने सीए परीक्षेत पहिली ये़ऊन यावर कळस चढवला. 

आश्‍विनी जोशी या कोकणात झालेल्या पहिल्या महिला आयएएस अधिकारी. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आज अनेक युवती प्रशासकीय क्षेत्रात कामगिरी करत आहेत. क्रीडा क्षेत्रात माणिक परांजपे यांनी कोकणाची मुद्रा कोरली होती. त्यानंतर पॉवर लिफ्टिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक पटकावणारी आणि छत्रपती पुरस्कार विजेती संपदा धोपटकर हिने क्रीडा क्षेत्रातील कामगिरी उंचावत नेली. ही परंपरा अद्याप सुरू आहे.

रोजगार निर्मितीचा आदर्श देणार्‍या पूजा चव्हाण

चूल आणि मूल या पलीकडेही महिलांनी आपले वेगळे विश्‍व निर्माण केले आहे. त्या काहीतरी वेगळे करून आपले अस्तित्व निर्माण करू शकतात. आपली एक नवी ओळख बनवू शकतात. हे दाखवून दिले आहे ते रत्नागिरी कारवांची वाडीतील पूजा चव्हाण यांनी. संसार सांभाळत छोटासा व्यवसाय कसा उभा करायचा आणि त्यात यशही कसे मिळवायचे हे त्यांनी दाखवून दिले आहे. आहिल्या स्वयंसहायता महिला बचत गट त्या चालवतात. त्या माध्यमातून त्यांनी महिलांना रोजगार निर्माण करून दिला आहे. विविध बँकांच्या माध्यमातून महिलांना त्यांनी रोजगार मिळवून दिला आहे. कलाकुसरीच्या बॅग, वस्तू बनवण्याचे मार्गदर्शन त्या करतात.