Wed, May 22, 2019 22:58होमपेज › Konkan › आनंदवाडी प्रकल्पाचा मेमध्ये शुभारंभ

आनंदवाडी प्रकल्पाचा मेमध्ये शुभारंभ

Published On: Mar 24 2018 1:50AM | Last Updated: Mar 23 2018 10:38PMदेवगड : प्रतिनिधी

देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून केंद्र शासनाच्या नीलक्रांती एकात्मिक विकास आणि मत्स्यव्यवसाय व्यवस्थापन कमिटी तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री यांच्या बैठकीत प्रकल्पाचा कामाला मंजुरी मिळाली आहे. मे महिन्यात या प्रकल्पाचा कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे अशी माहिती खा. विनायक राऊत यांनी दिली.

देवगडचे अर्थकारण बदलून टाकणार्‍या आनंदवाडी प्रकल्पाचा कामाला आता खर्‍या अर्थाने चालना मिळाली असून या प्रकल्पाला केंद्रशासनाची अंतिम मंजुरी मिळाली आहे.केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेतून या प्रकल्पासाठी 25 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. मार्च अखेरीस हा निधी राज्य शासनाकडे उपलब्ध करून दिला जाणार आहे. या प्रकल्पाचा पुढील कार्यवाहीकरिता मत्स्य व्यवसाय आयुक्‍त श्री.विधाते यांनी आवश्यक निविदा प्रक्रिया पूर्ण करून या प्रकल्पाचे सर्व तांत्रिक बाबीही एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण करून देण्याय सांगितले आहे.त्यामुळे मे महिन्यामध्ये प्रकल्पाचा कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ होणार असल्याचे खा. राऊत म्हणाले.

आनंदवाडी बंदर प्रकल्पाचे काम गेली अनेक वर्षे रखडले होते.प्रथम स्थानिक ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेता त्यांच्या मागणीप्रमाणे प्रकल्प  लोकवस्तीपासून पुढे 500 मीटर सरकविण्यात आला. मात्र, त्यानंतर अनेक कारणामुळे प्रकल्पाचे काम रखडले होते.या कालावधीत प्रकल्पाची किंमत वाढून ती 88.4 कोटीपर्यंत पोहचली. सुरूवातील केंद्रशासनाचा 75 टक्के निधी व राज्यशासनाचा 25 टक्के निधी या प्रकल्पासाठी देण्याचे ठरले.मात्र त्यानंतर यामध्ये बदल होवून केंद्रशासन 25 कोटी रूपये व राज्य शासनाने उर्वरीत रक्कम 63.4 कोटी रुपये द्यावेत असे ठरले.

त्यानुसार राज्य शासनाने 63.4 कोटी रुपये मंजूर करून मागील बजेटमध्ये 10 कोटींची तरतुदही केली.मात्र केंद्रशासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत हा प्रकल्प होता. आता निधीची तरतुद झाल्यामुळे कित्येक वर्षे प्रतीक्षेत राहीलेला आनंदवाडी प्रकल्प आता प्रत्यक्षात साकारला जाणार असून यामुळे देवगड तालुक्याचा चेहरामोहरा बदलून जाणार आहे. या प्रकल्पातुन स्थानिक बेरोजगारांनाही रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहे.

 

Tags : konkan, Devgad news, Anandavadi project,