Mon, Jan 27, 2020 12:09होमपेज › Konkan › चिपळूण, गुहागरात जंगलतोडीचा सपाटा

चिपळूण, गुहागरात जंगलतोडीचा सपाटा

Published On: Nov 23 2018 1:21AM | Last Updated: Nov 22 2018 9:20PMचिपळूण : प्रमोद पेडणेकर

निसर्गसौंदर्य व घनदाट वनराईने वेढलेल्या कोकणला भकास करण्याचे कारस्थान सातत्याने होत असताना वनखात्याकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर जंगलतोड सुरू आहे. लाकूड माफियांच्या दबावाखाली वनविभाग आला असून यामुळे कोकणातील वनसंपदा धोक्यात आली आहे. त्यामुळे पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. 

कोकणातून गेली अनेक वर्षे सातत्याने कोकणातील उद्योगाबरोबरच घाटावरील उद्योग, साखर कारखाने यांना जळणासाठी मोठ्या प्रमाणावर लाकूड पुरविले जाते. सातत्याने जंगलतोड सुरू आहे. लांजा, चिपळूण, गुहागर व खेड तालुक्यांतील पंधरागाव विभागात सर्रास वनसंपदेची कत्तल सुरू आहे. शेकडो ट्रक रोज सायंकाळी 6 नंतर कुंभार्ली व आंबा घाटमार्गे पश्‍चिम महाराष्ट्रात लाकूड घेऊन जात असतात. रत्नागिरी जिल्ह्यातील ही वनसंपदा हा एक नैसर्गिक ठेवा आहे. या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणावर वनौषधीचीही कत्तल होते आहे. शिवाय बेसुमार जंगलतोडीमुळे जंगलातील वन्यजीव यांचे अस्तित्त्वही धोक्यात आले आहे. जंगलतोड  माफियांचा सातत्याने राबता जंगलभागात वाढल्याने वन्यजीवांना शिकार मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे मानवी वस्तीकडे वन्यजीव वळत आहेत. त्यातून जनावरे व माणसांवर हल्ल्याचे प्रसंगही उद्भवू लागले आहेत. या पाठीमागे बेसुमार जंगलतोड हे कारण असल्याचे बोलले जात आहे. 

खेडच्या पंधरागाव पट्ट्यात, लांजा, चिपळूण, गुहागर या भागातही वर्षाच्या बाराही महिने शेकडो मजूर जंगलतोड करीत असतात. कोकण भकास करण्याच्या कारस्थानामुळे पर्यावरणालाही धोका वाढतो आहे. त्यातूनच डोंगर कोसळणे व डोंगरावरील माती मोठ्या प्रमाणावर नदीनाल्यातून वाहून येत असल्याने गाळाचे संकटही उभे राहिले आहे. वनविभागाला अंधारात ठेवून एवढी जंगलतोड शक्य नाही. लाकूडतोड करणारे व्यापारी किरकोळ पासावर भरमसाठ लाकूड वाहतूक करतात व त्याला वनविभागाचा जाहीर आशीर्वाद आहे, असा संताप सामाजिक संस्था व्यक्‍त करीत आहेत. चिपळूणच्या करंबवणे खाडीपट्टा विभागात, गुहागर तालुक्यातील आबलोली, पालशेत पट्ट्यात व खेडच्या पंधरागाव पट्ट्यात अगदी डोंगरभागात लाकूड वाहतूक करणारे ट्रक नेणारे रस्तेही बनविण्यात आले आहेत. कोकणाचा हा अमूल्य ठेवा जपण्यासाठी वनविभागाने सतर्क राहावे. अन्यथा वरिष्ठ पातळीवर रत्नागिरी जिल्ह्यातील जंगलतोडीचा अहवाल पाठविण्यात येणार आहे.