Mon, Jul 22, 2019 03:09होमपेज › Konkan › खडतर आव्हाने, तरीही मतदारसंघाच्या विकासाला दिशा

खडतर आव्हाने, तरीही मतदारसंघाच्या विकासाला दिशा

Published On: Jul 09 2018 1:03AM | Last Updated: Jul 08 2018 8:59PMचिपळूण : प्रमोद पेडणेकर

लांजा-राजापूर-साखरपा हा आपला विधानसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या खडतर आहे. या मतदारसंघात पायाभूत सुविधा गावोगावी आपण पोहोचविल्या आहेत. मतदारसंघाचा पायाभूत विकास मार्गी लागत असताना सामाजिक व आर्थिक विकासाकडे यापुढे आपण अधिक गतीने कार्यरत राहाणार असल्याचे आमदार राजन साळवी यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

53व्या वाढदिवसाच्या पार्श्‍वभूमीवर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी, गेली आठ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून या मतदारसंघामध्ये व शिवसैनिक म्हणून या जिल्ह्यामध्ये तीस वर्षे निष्ठेने कार्यरत राहिल्याने जनतेचे प्रेम सदैव आपल्या मागे असल्याचे नमूद केले. हा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या खडतर आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा पोहोचविणे सर्वात महत्त्वाचे होते. गेल्या आठ वर्षात लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षांना आपण प्रामाणिकपणे भिडण्याचा प्रयत्न केला.  रस्ते, दळणवळण, आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी, जलसंपदा, वीजपुरवठा यासाठी आपण आग्रही प्रसंगी कठोर भूमिका घेतली आहे. दूरसंचार क्षेत्रामध्येही तालुक्यात मोबाईल टॉवरच्या समस्याही पुढील काही महिन्यात दूर होतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचीही आपल्याला मोठी साथ लाभली. आपण सातत्याने लोकांमध्ये राहिलो, सुख-दु:खात सहभागी झालो. जनतेच्याप्रती असलेली आपली बांधिलकी अखेरच्या श्‍वासापर्यंत कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली. आपल्या मतदारसंघात पर्यटन विकासाला मोठी संधी आहे. यादृष्टीने आपले ठोस प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद व शिवसैनिकांची साथ या बळावर जनतेला नको असलेले नाणार व जैतापूरसारख्या प्रकल्पांविरोधात आपला लढा या पुढेही सुरू राहील. नुसताच लढा असणार नाही तर येथील जनतेच्या मुळावर येणारे कोणतेही प्रकल्प येथून हटविल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही, असा गर्भित इशाराही मुलाखतीदरम्यान आ. साळवी यांनी दिला.

शिवसेना व कोकणचे अतूट असे भावनिक नाते आहे. या नात्याचे दायित्त्व स्वीकारुन येथील कोकणी माणसाच्या सामजिक व आर्थिक विकासाला पुढील काळात आपण भिडणार आहोत. यासाठी पर्यटन, फळप्रक्रिया उद्योग व स्वयंरोजगाराला उत्तेजन देण्यासाठी पक्षप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली ठोस कार्यक्रम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लांजा, राजापूर व साखरपा विभागातील जनतेला उत्तम दर्जाच्या व व्यापक आरोग्य सुविधा, मजबूत रस्त्यांचे जाळे मतदारसंघात विणणे व कृषी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या भूमिकेतून तरूणांना उत्तेजन देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशिल असतो. स्वच्छ भूमिका व प्रामाणिक प्रयत्न ठेवूनच मी राजकारणामध्ये कार्यरत आहे. या मतदारसंघाचा ठसा राज्यभरात चर्चिला जावा असा विकासाचा पॅटर्न राबविण्यासाठी येणार्‍या कालखंडात आव्हान स्वीकारुन काम करणार असल्याचे आ. राजन साळवी यांनी यावेळी नमूद केले.