Thu, Apr 25, 2019 17:32होमपेज › Konkan › मिरजोळे येथे भूस्खलन

मिरजोळे येथे भूस्खलन

Published On: Jun 30 2018 1:17AM | Last Updated: Jun 29 2018 10:17PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शहरानजीक असलेल्या ग्रामीण भागातील मिरजोळे मधलीवाडी परिसरातील खालचापाट येथे पुन्हा एकदा पावसामुळे भूस्खलन झाले  आहे. जमिनीला भेगा पडून मोठ्या प्रमाणावर माती वाहून जात असून शेतीचा मधल्याच भागाला तडे जात असल्याने येथील सुमारे 15 एकरांहून जास्त शेती संकटात आली आहे. सहा वर्षांनी पुन्हा हा प्रकार घडल्याने येथील शेतकरी भयभीत झाले आहेत. गेला महिनाभर होत असलेल्या मुसळधार पावसाने हा प्रकार घडत असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मिरजोळे येथे हा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला.

प्रशासकीय अधिकार्‍यांनी पाहणी करुन येथील जमिनीला तडा जाण्याच्या या प्रकाराची भौैगोलिक तज्ज्ञांकडून पाहणीही केली होती. परिघाकृती भूस्खलनाचा हा प्रकार त्यावेळी नमूद करताना झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करण्यात आला होता. त्यावर उपाय योजनाही सुचविण्यात आली होती. त्यानंतरही  सातत्याने पाठपुरावा करून यावर उपाय करताना काँक्रीटचा धूपप्रतिबंधक  बंधारा आणि नदीवर छोटा बंधारा (धरण) बांधण्यात आले. त्यावर सुमारे 15 ते 20 लाख खर्च झाले. पण उपाययोजना करूनही सध्या होत असलेल्या  मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा जमीन सुमारे 100 फूट लांब आणि 15 ते 20 फूट उंच खचू लागली आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत.  अशीच जमीन खचत राहिल्यास ऐन खरिपाच्या हंगामात आणि लावणीच्या काळात हा धोका वाढणार आहे. त्यामुळे काही एकर  शेतजमीन नष्ट होण्याची भीती आहे. येथे भाटवडेकर तसेच वाडकरवाडी लोकवस्ती आहे. जमीन खचण्याच्या प्रकारामुळे येथील लोकवस्तीलाही धोका असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

यापूर्वी केलेली उपाययोजना अर्धवट असून आणखी उपाययोजना करण्याची  आवश्यकता असून येथील शेती आणि बागायती संकटात सापडली आहे. या गावठाण परिसरात दत्ताराम गावकर, राजाराम गावडे, गंगाराम गावकर,  भास्कर चव्हाण, रमेश भाटकर, भाऊ भाटवडेकर यांची शेतजमीन आहे. बंधारा उभारल्यानंतर  नदीच्या प्रवाह बदल झाल्याने जमिनीखालील पाण्याच्या अंतर्गत प्रवाहामुळे हा खचण्याचा प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात येते.

2006 चीच पुनरावृत्ती

2006 मध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यावेळीही मोठे भूस्खलन झाले होते. या भूस्खलनात येथील 4-5 एकर जमीन एकाच वेळी खचली होती. त्यामुळे येथील शेती, बागायतीदेखील उद्ध्वस्त झाली. या प्रकारामुळे  त्या भागातील शेतकर्‍यांनी शेती करणेही सोडून दिले होते. या प्रकाराने प्रशासकीय यंत्रणाही हलली होती.