Thu, May 23, 2019 15:09
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › अणुस्कुरा घाटात दरड कोसळली

अणुस्कुरा घाटात दरड कोसळली

Published On: Jul 13 2018 12:49AM | Last Updated: Jul 12 2018 11:12PMराजापूर  : प्रतिनिधी

जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून सरींवर सरीने पडणार्‍या पावसाने दुपारनंतर सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार हजेरी लावली. त्यामुळे बुधवारी रात्री 11.00 वाजण्याच्या सुमारास अणुस्कुरा घाटात दरड कोसळून संपूर्ण घाटातील वाहतूक बंद झाली. गुरुवारी सकाळपासून दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. पावसामुळे जिल्ह्यात पाच लाखांची हानी झाली.

राजापूर तालुक्यात देखील तुफान पर्जन्यवृष्टी होत आहे. बुधवारी रात्री 11 वाजता अणुस्कुरा घाटात दरड कोसळून संपूर्ण घाटमार्गाची वाहतूक बंद पडली. त्यामुळे गुरुवारी घाटमार्गे जाणारी सर्व वाहतूक अन्य मार्गे वळविण्यात आली. राजापूर आगारातून कोल्हापूरकडे जाणार्‍या गाड्या भुईबावडामार्गे वळविण्यात आल्या, तर पश्‍चिम महाराष्ट्रकडून येणार्‍या गाड्या त्याचमार्गे आल्या.अन्य खासगी वाहतूक आंबा घाटासह भुईबावडामार्गे सुरू होती.

घाटातील कोसळलेली दरड हटविण्याचे काम बांधकाम विभागाच्या वतीने सुरू होते. जेसीबी मशीनच्या सहाय्याने दिवसभर काम सुरू होते. घाटात दरड कोसळल्यानंतर तेथून काही अंतरावर असलेल्या अणुस्कुरा पोलिस चेकपोस्टवरील पोलिस कर्मचार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अणुस्कुरा घाटातील अधून-मधून कोसळणार्‍या दरडींमुळे घाटातून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. 

दि. 12 जुलै रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या प्राथमिक अहवालानुसार खेड तालुक्यात मौजे जामगे येथे प्रमोद धनाजी दळवी यांच्या शेताचे  पावसामुळे 12 हजार रुपयांचे, उत्तम विठ्ठोबा कदम यांच्या शेताचे पावसामुळे 5 हजार रुपयांचे अंशत: नुकसान झाले आहे. मौजे जामगे येथील स्मशानभूमीचे संरक्षण भिंत पावसामुळे कोसळल्याने  1 लाख रुपयांचे अंशत: नुकसान झाले आहे. मौजे आंबळे येथील ग्रामपंचायतीची संरक्षण भिंत पावसामुळे कोसळल्याने 2 लाख रुपयांचे अंशत: नुकसान झाले आहे. मौजे आंबळे येथे महादेव पांडुरंग सकपाळ यांच्या शेताचे पावसामुळे 10 हजार रुपयांचे अंशत: नुकसान झाले आहे. मौजे पुर्वळ येथे चंद्रकांत पांडुरंग घुटेकर यांच्या गोठ्याचे पावसामुळे  10 हजार रुपयांचे अंशत: नुकसान झाले आहे.

मौजे चाकाळे येथे अंगणवाडीची इमारत पावसामुळे कोसळल्याने इमारतीचे अंशत: नुकसान झाले आहे. मौजे नांदिवली येथील प्रवीण शंकर चव्हाण यांच्या घराचे पावसामुळे 25 हजार रुपयांचे, दत्ताराम लक्ष्मण चव्हाण यांच्या घराचे पावसामुळे 25 हजार रुपयांचे, अनुसया सखाराम चव्हाण यांच्या घराचे पावसामुळे 25 हजार रुपयांचे व अशोक नारायण चव्हाण यांच्या घराचे पावसामुळे 25 हजार रुपयांचे अंशत: नुकसान झाले आहे. मौजे उबरी येथे अंकुश गंगाराम म्हापदी यांच्या घराचे पावसामुळे 4 हजार 424 रुपयांचे नुकसान झाले आहे. मौजे खवटी येथे सुनील दगडू मंडलिक यांच्या घराचे पावसामुळे 59 हजार  800 रुपयांचे अंशत: नुकसान झाले आहे. संगमेश्‍वर तालुक्यात मौजे कडवई येथे गोपाळ सखाराम कादवे यांच्या घराचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले.