Tue, Apr 23, 2019 10:07होमपेज › Konkan › चिपी विमानतळावर १२ सप्टेंबर रोजी ‘लँडिंग’

चिपी विमानतळावर १२ सप्टेंबर रोजी ‘लँडिंग’

Published On: Aug 03 2018 1:35AM | Last Updated: Aug 02 2018 10:58PMमुंबई : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर गणेश चतुर्थीच्या आधल्या दिवशी म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी विमान लँडिंग करण्याचा निर्णय गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत चिपी विमानतळाच्या कामाचा आढावा घेऊन विमानतळासाठी आवश्यक असलेल्या वीज, पाणी, रस्ते या पायाभूत सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून विमानतळ कार्यान्वित करण्याच्या सूचना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आय.आर.बी. कंपनी व सर्व संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत. 6 ऑगस्ट रोजी या पायाभूत सुविधा तातडीने पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

चिपी विमानतळ हवाई वाहतूक चालू करणे व अडीअडचणींवर उपाययोजना करण्यासंदर्भात ना. सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व  ना. दीपक केसरकर, पालकमंत्री सिंधुदुर्ग यांच्या उपस्थितीत गुरुवारी 2 ऑगस्ट 2018 रोजी मुंबईत बैठक घेण्यात आली. या बैठकीस श्री. म्हैसकर, आय.आर.बी. कंपनीचे चेअरमन व कंपनीचे अधिकारी श्री. सुशीलकुमार पांडे, सुधीर होरिंग, किरण कुमार, मुकेश वर्मा, सहा. निदेशक, डी.जी.सी.ए. तसेच आर.व्ही.सोनने, मुख्य अभियंता, म.औ.म.म.रा., एस.आर.बर्गे, विभागीय अधिकारी, रत्नागिरी उपस्थित होते. चिपी विमानतळ हवाई वाहतूक 12 सप्टेंबर 2018 रोजी प्रायोगिक तत्त्वावर चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतर 2 महिन्यांच्या अवधीत विमानसेवा नियमित चालू करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा झाली. तसेच विमानतळासाठी नियमित पाणीपुरवठा व सुरळीत विद्युतपुरवठा, तसेच रस्ते व अवजड वाहतूक यासारख्या उपाययोजना करण्यासाठी बैठक पालकमंत्री, सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, 6 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग तसेच सर्व संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.

चिपी विमानतळासाठी आवश्यक असलेल्या जमीन अल्पदरात संपादित  करण्यात आली आहे. त्यामुळे संपादित जमिनीच्या प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्‍तीस नोकरी उपलब्ध करून देणे व चिपी गावातील इतर व्यक्‍तींना पात्रतेप्रमाणे नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावे, अशी आग्रही मागणी 

पालकमंत्री सिंधुदुर्ग यांनी आय.आर.बी.चे चेअरमन यांच्याकडे केली व त्यांनी सदर मागणी मान्य केली आहे. त्याचप्रमाणे विमानतळ झाल्यामुळे चिपी गावातील लोकांना 1.5 कि.मी. अंतर प्रवास करण्यासाठी 8 कि.मी. प्रवास करावा लागतो. त्याबाबत आय.आर.बी. मालक व चेअरमन यांनी एस.टी. बसच्या प्रवासाच्या भाड्यातील 6.5 कि.मी. अंतराचा फरक एस.टी. महामंडळाकडे कंपनीने भरुन देण्याचे मान्य केले आहे. तसेच चिपी गावातील रस्ते लवकरच व्यवस्थित करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे, असे  पालकमंत्री यांनी स्पष्ट केले.