Sun, Nov 18, 2018 17:42होमपेज › Konkan › दहा सप्टेंबरला चिपी विमानतळावर लँडिंग

दहा सप्टेंबरला चिपी विमानतळावर लँडिंग

Published On: Sep 06 2018 10:08PM | Last Updated: Sep 06 2018 9:10PMकुडाळ : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित अशा ग्रिन फिल्ड चिपी विमानतळावर बुधवार 12 सप्टेंबर रोजी विमानाच्या ‘लँडिंग’चा मुहूर्त निश्‍चित झाला असतानाच आणि तशी तयारी सुरू असताना तत्पूर्वी दोन दिवस अगोदर सोमवार 10 सप्टेंबर रोजी विमानाचे ‘ट्रायल लँडिंग’ होणार असल्याची माहिती खा. विनायक राऊत यांनी दिली आहे. 

या ‘ट्रायल लँडिंग’करिता फॉल्कन कंपनीचे विमान मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून सकाळी 10 वाजता टेकऑफ घेवून 11.30 वाजता चिपी विमानतळावर उतरणार आहे. याकरिता विकासक म्हणून कार्यरत असलेल्या नामांकित अशा आयआरबी कंपनीने सर्वतोपरी तयारी केली आहे.

पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला कलाटणी देणारा वेंगुर्ले तालुक्यातील चिपी विमानतळ प्रकल्प आहे. 271 हेक्टर क्षेत्रात विस्तारलेला 17 वर्षांपूर्वी शुभारंभ झालेला चिपी विमानतळाचा हा प्रकल्प आता मूर्त रूप घेत आहे. यापूर्वी 12 सप्टेंबर रोजी चिपी विमानतळावर विमान लॅन्डिंग होणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली होती. माल्टा देशातील विमान 12 रोजी लॅन्डिंग होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी जाहीर केले आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय उड्डानमंत्री सुरेश प्रभू, माजी मुख्यमंत्री,खा. नारायण राणे उपस्थित राहणार आहेत. आता त्या अगोदर दोन दिवस 10 रोजी फॉल्कन कंपनीचे विमान लॅन्डिंग होणार आहे. 10 आणि 12 या दोन्ही तारखांना होणारे लॅन्डिंग हे ट्रायल लॅन्डिंग असणार आहे. त्यानंतर भारतीय विमान प्राधिकरणची ना हरकत मिळाल्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजेच डिसेंबर महिन्यापासून नियमित वाहतूक सुरू होणार आहे. 

विमानतळ बांधणार्‍या आय.आर.बी या कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, तंत्रज्ञ दिवसरात्र विमानतळाच्या ठिकाणी राबत आहेत. ट्रायल लॅन्डिंग केवळ चार दिवसांवर येवून ठेपल्याने मालवणी माणसाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.