Tue, Apr 23, 2019 23:39होमपेज › Konkan › प्रकल्पग्रस्तांसाठी ‘कोरे’कडून खास पोर्टल

प्रकल्पग्रस्तांसाठी ‘कोरे’कडून खास पोर्टल

Published On: May 12 2018 1:29AM | Last Updated: May 11 2018 9:10PMरत्नागिरी : प्रतिनिधी

कोकण रेल्वेने प्रकल्पग्रस्तांसाठी एक नवी सुविधा सुरू केली आहे. प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या जनतेच्या तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी ‘लँडलूझर ग्रीव्हन्स पोर्टल’ नावाचे संकेतस्थळ 9 मे पासून सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलचा उपयोग अधिकाधिक लोकांनी करून घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेचे रत्नागिरी विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपेंद्र शेंड्ये यांनी केले आहे.

ते म्हणाले, ‘कोकण रेल्वे डॉट कॉम’ या संकेतस्थळावर ‘कॉन्टॅक्ट’ असे मेन्यूमध्ये ‘लँडलूझर ग्रीव्हन्स पोर्टल’ सुरू करण्यात आले आहे. कोणत्याही ठिकाणाहून त्या पोर्टलवर दिवसातल्या 24 तासांपैकी कोणत्याही वेळी जाता येते. या पोर्टलवर प्रकल्पग्रस्तांनी आपल्या समस्या लिहून कळवाव्यात, अशी अपेक्षा आहे. दाखल झालेल्या प्रत्येक तक्रारीची दखल घेण्यात येईल. प्रकल्पग्रस्तांनी दिलेल्या पत्त्यावर त्यांना उत्तर कळवण्यात येईल.

हे पोर्टल सुरू व्हावे म्हणून कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांचे विशेष प्रयत्न आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी दूर करण्यासाठी पोर्टल सुरू करणे ही एक महत्त्वाची बाब ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. जमिनीच्या मोबदल्यासंदर्भात किंवा प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यासंदर्भात अनेक तक्रारी असू शकतात. लोकांनी त्या पोर्टलवर नोंदवाव्यात म्हणजे प्रत्येक प्रकरण काय आहे ते तपासून योग्य उत्तर देण्यात येईल. प्रत्येक तक्रारीची गोपनीयता अनिवार्यपणे राखली जाईल, असेदेखील यावेळी शेंड्ये यांनी सांगितले.