Tue, Mar 26, 2019 23:55होमपेज › Konkan › कचरा डंपिंग ग्राऊंडसाठीचा जमीन खरेदी व्यवहार संशयास्पद!

कचरा डंपिंग ग्राऊंडसाठीचा जमीन खरेदी व्यवहार संशयास्पद!

Published On: Jun 28 2018 1:33AM | Last Updated: Jun 27 2018 11:09PMमालवण  : प्रतिनिधी

मालवण नगरपालिकेच्या नावे जमीन नसतानाही त्यावर लाखो रूपयांचा खर्च करून मालवण नगरपालिकेने शासनाच्या निधीचा गैरवापर केला आहे.  यात कहर म्हणजे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनीही स्वत:चा अधिकार वापरत निधी खर्च करण्यास परवानगी दिलेली आहे. कचरा डंपिंग ग्राऊंडसाठी करण्यात आलेली जमीन खरेदी ही पूर्णत: संशयास्पद असल्याचे माहिती अधिकारात घेतलेल्या कागदपत्रांतून स्पष्ट होत आहे. जमीन विक्री केलेल्या एका कुटुंबियाने तर या व्यवहारावर हरकत नोंदविली आहे. यामुळे तालुका काँग्रेसकडून याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष बाळू अंधारी व सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी दिली.

तालुका काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. मेघनाद धुरी, शहर अध्यक्ष जेम्स फर्नांडिस, संदेश कोयंडे, जीवन भोगावकर, लक्ष्मीकांत परूळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. श्री अंधारी म्हणाले, पारदर्शक कारभाराचे काय झाले. कचरा डंपिंग ग्राऊंडसाठी 61  गुंठे जमीन खरेदी करताना नगरपालिकेने कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतलेली नाही. सदर जमिनीचा सर्च रिपोर्ट अगर वृत्तपत्रात प्रसिद्ध देवून खरेदी-विक्री व्यवहारासाठी हरकतींबाबत माहिती घेतलेली नाही. यामुळेच 5 ऑक्टोबर 2017 रोजी खरेदीखत होवूनही आजपर्यंत सातबारा नगरपालिकेच्या नावे झालेला नाही. असा दावा या पदाधिकार्‍यांनी केला.

जमीन विक्री करणार्‍या कुटुंबांने या व्यवहाराला हरकत नोंदविली आहे. यामुळे पालिकेने तब्बल 1 कोटी 26 लाख रूपये जमीन मालकांना देवूनही सातबारा ताब्यात मिळालेला नाही. असे असतानाही नगराध्यक्षांनी स्वत:चा अधिकार वापरून वादग्रस्त जमिनीत लाखो रुपयांचा निधी कचरा डेपोसाठी  खर्च केला आहे. नगराध्यक्षांच्या पारदर्शक कारभाराचा पर्दाफाश यानिमित्ताने झाला आहे. जमीन खरेदीसाठी घिसाडघाई कशासाठी करण्यात आली याचे उत्तर नगराध्यक्ष देणार काय ? असा सवाल अंधारी यांनी केला आहे.

विरोधकांचीही मिलीभगत! 

नगराध्यक्षांवर काँग्रेसने टीका केल्यानंतर पालिकेतील विरोधकांनी एकत्रित येत काँग्रेसवर पलटवार केला होता. नगराध्यक्षांवर केलेली टीका विरोधकांनाही झोंबली होती. यामुळे नगराध्यक्षांनी उत्तर देण्याऐवजी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी पुढाकार घेत काँग्रेसवर टीका करताना नगराध्यक्षांच्या कारभाराला पाठिंबा दिला होता. यामुळे  विरोधकांच्या साथीने नगराध्यक्ष कारभार पहात आहेत काय? यापूर्वी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासंदर्भात नगराध्यक्षांवर टीका करणारे सुदेश आचरेकर अचानक नगराध्यक्षांचे कसे झाले? असा उपरोधीक सवाल काँग्रेसने केला आहे.  जिल्हाधिकारी यांनी 58(2) च्या वापरावर चौकशी करण्याचे आदेश नगरपालिकेला दिलेले आहेत. मात्र, गेले तीन महिने या आदेशावर कार्यवाही होत नसल्याने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला पालिकेने केराची टोपली दाखविली काय?  असाही सवाल काँग्रेसने केला आहे.

त्या अन्यायग्रस्त कुटुंबीयांची काँग्रेसला साद 

‘त्या’ कुटुंबीयांना न्याय देणार जमीन व्यवहारात फसवणूक झालेल्या कुटुंबियांनी आमच्याकडे न्यायासाठी सहकार्य मागितले आहे. यामुळे तालुका काँग्रेस या कुटुंबियांच्या पाठिशी ठामपणे उभी राहणार आहे. नगरपालिकेनेही कुलमुखत्यारपत्राच्या आधारे खरेदीखत करताना योग्य ती काळजी घेतलेली नसल्याचे दिसून येत आहे. सातबारा नोंद होण्यासाठी तलाठ्यांकडे प्रकरण गेलेले असल्याने त्याठिकाणी या कुटुंबियांनी हरकत नोंदविलेली आहे. भविष्यात अन्यायग्रस्त कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सहकार्य करणार असल्याचेही श्री. अंधारी यांनी स्पष्ट केले.