Wed, Apr 24, 2019 21:29होमपेज › Konkan › ओसरगावातील कुलमुखत्यार प्रकरणी एकास अटक

ओसरगावातील कुलमुखत्यार प्रकरणी एकास अटक

Published On: Mar 05 2018 1:43AM | Last Updated: Mar 04 2018 9:59PMकणकवली : वार्ताहर

ओसरगावातील एका जमीन व्यवहार प्रकरणात 1996 मधील कुलमुखत्यारचा वापर करून 5 एकर जमीन विकण्यात आली होती. याप्रकरणी ओसरगाव येथील अंशुमन गावडे यांनी 30 डिसेंबर 2016 रोजी कणकवली पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान कुलमुखत्यार देण्यास टाळाटाळ करत असल्याने पोलिसांनी बाबाजी नारायण कोलते (60, ओसरगाव) याला अटक केली. त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

अंशुमन गावडे यांनी वडिलोपार्जीत जमिनीच्या विक्री संदर्भात कणकवली पोलिसात बाबाजी कोलते याच्याविरुद्ध तक्रार दिली होती. गावडे यांच्या वडिलोपार्जीत जमिनीचे 1996 मधील कुलमुखत्यारपत्राचा आधार घेत कोलते यांनी पाच एकर जमिनीची विक्री केली होती. त्याची माहिती मिळाल्यानंतर अंशुमन गावडे यांनी डिसेंबर 2016 मध्ये पोलिसात तक्रार दिली होती. या प्रकरणाच्या तपासात संशयित बाबाजी कोलते याच्याकडून पोलिसांना सहकार्य केले जात नव्हते. जमीन विक्रीसाठी वापरलेले कुलमुखत्यारपत्र देण्यास बाबाजी कोलते याच्याकडून टाळाटाळ केली जात होती. माहिती दिली जात नसल्याने प्रकरणाच्या तपासाला गती मिळत नव्हती.  कुलमुखत्यारपत्र देण्यास टाळाटाळ होत असल्याने पोलिसांनी शनिवारी रात्री बाबाजी कोलते याला अटक केली. त्याला येथील न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले करत आहेत.