होमपेज › Konkan › लैला-मजनूच्या ‘मजार’वर भरतो प्रेमिकांचा मेळा 

लैला-मजनूच्या ‘मजार’वर भरतो प्रेमिकांचा मेळा 

Published On: Feb 14 2018 2:52AM | Last Updated: Feb 13 2018 10:27PMजयपूर : वृत्तसंस्था

हीर-रांझा, रोमियो-ज्युलिएट आणि लैला-मजनू या प्रेमकथा कित्येक शतके उलटली तरी आजही अजरामर आहेत. राजस्थानच्या तप्‍त वाळवंटात फुलेली मात्र शोकांतिकाच ठरलेली लैला-मजनूची कहाणी आजही अशीच ताजी आहे. हे प्रेमी जिवंतपणी भेटू शकले नसले, तरी त्यांची ‘मजार’ मात्र प्रेमीयुगलांचे ‘तीर्थस्थान’ बनले आहे. श्रीगंगानर जिल्ह्यातील बिजौर येथे लैला-मजनूच्या ‘मजार’वर ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी प्रेमीयुगलांची जत्रा भरते.

या मजारवर येऊन प्रेमीयुगुल जन्मोजन्मी साथ देण्याची शपथ घेतात आणि आपली साथ कायम राहावी, यासाठी ‘मन्‍नतों के धागे’ही बांधतात. येथून पाकिस्तानची सीमा अवघ्या 10 किलोमीटरवर आहे. त्यामुळे पाकमधील अनेक प्रेमीयुगलेही येथे येत असतात. व्हॅलेंटाईन डेशिवाय इतर दिवशीही येथे प्रेमीयुगले येतात. त्याशिवाय जून महिन्यात दोन दिवसांचा उरूसदेखील असतो. विशेष म्हणजे, आंतरजातीय विवाह करणार्‍या जोड्या येथे जास्त प्रमाणात येतात. सगळ्या जाती-धर्माच्या जोड्या या मजारवर येतात. येथे येणार्‍या जोड्यांना कधीही वियोगाचे दु:ख येत नाही, अशीही भावना आहे.

कोण होते लैला-मजनू? 

सातव्या शतकातील ही प्रेमकथा आहे. हे दोघे पाकिस्तानातील होते, असे मानले जाते. एका अरबपती शाहचा कैस ऊर्फ मजनू हा मुलगा होता, तर लैला ही गरीब घराण्यातील होती. दोघांची प्रेमकथा फुलत असताना लैलाच्या भावाने मजनूचा खून केला, अशी एक कथा आहे. प्रेम समाजाला मान्य नसल्याने दोघांनी आत्महत्या केली, असेही मानले जाते. तर दोघेही घरातून पळून राजस्थानात आले. मात्र, तहान-भुकेने त्यांचा मृत्यू झाल्याचे काहीजण सांगतात.

कोई पथर से ना मारे... 

‘लैला-मजून’च्या कथेवर 1976 साली चित्रपटही आला होता. त्यात मजनूची भूमिका ऋषी कपूरने, तर लैलाची रंजिताने केली होती. ‘कोई पथर से ना मारे मेरे दिवाने को...’, ‘इस रेशमी पाजेब कि झंकार के सदके’ अशी गाणी आजही श्रवणीय आहेत.