Thu, Jul 18, 2019 00:56होमपेज › Konkan › मजूर सहकारी संस्थांच्या कामाची मर्यादा ३० लाखांपर्यंत 

मजूर सहकारी संस्थांच्या कामाची मर्यादा ३० लाखांपर्यंत 

Published On: Mar 05 2018 10:40PM | Last Updated: Mar 05 2018 10:35PMकणकवली : प्रतिनिधी

मजूर सहकारी सोसायट्यांसाठी ई-निविदा मर्यादा साडेसात लाखावरून 15 लाख व 15 लाखांवरून 30 लाख रु.वाढविण्याचा निर्णय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. यामुळे सिंधुदुर्गातील 175 पेक्षा जास्त संस्थांसह राज्यातील मजूर सहकारी सोसायट्यांना चारपट अधिक कामे मिळणार आहेत, अशी माहिती मजूर व औद्योगिक सहकारी संस्था मतदारसंघातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळावर निवडून गेलेले भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांनी दिली. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून अडचणीत आलेल्या मजूर सहकारी संस्थांना कामे वाटप व त्यांच्या उत्कर्षासाठी मुख्यमंत्री  फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्या आदेशावरून 1 मार्च रोजी आ. प्रवीण दरेकर यांच्यासमवेत झालेल्या संयुक्‍त बैठकीत ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत.

मजूर सहकारी संस्थांना दिलासा

मंत्रालयात 7 जानेवारी रोजी या संबंधित झालेल्या बैठकीतील निर्णयावर शासनाने सोमवारी अधिकृतरित्या शिक्कामोर्तब करून मजूर सहकारी संस्थांना दिलासा दिला आहे. 

ई निविदेतील कामाचे वाटप 33:33:34 या प्रमाणामध्येच करावे, 33 टक्के कामे मजूर सहकारी सोसायट्यांसाठी राखीव राहतील आणि कामाची संख्या विचारात न घेता कामाची किंमत विचारात घेण्यात यावी, एका मजूर संस्थेत वाटप करावयाच्या एका कामाची कमाल मर्यादा अ वर्गाकरिता 15 लाखांऐवजी 30 लाख रूपये, ब वर्गाकरिता साडेसात लाखांऐवजी 15 लाख , एका वर्षात मजूर संस्थांना देण्यात येणार्‍या कामाच्या रक्कमेची मर्यादा 50 लाखांवरून 1 कोटी रुपये, 3 लाखांच्या आतील कामांचे एकत्रिकरण न करता ती कामे सोसायटीस विनानिविदा मिळणार आहेत. या निर्णयामुळे आवश्यक असणार्‍या मजूर सहकारी संस्थांची पंजीकरणाची मर्यादा वाढविण्याबाबत योग्य सुधारणा केली जाणार आहे. मजूर सहकारी संस्थांना त्यांच्या कामाचे रेकॉर्ड दाखवून पंजीवृध्द कॉन्ट्रॅक्टर्समध्ये पुढील टप्प्यामध्ये पंजीकरण करण्यासही मार्ग मोकळा राहणार आहे.

विद्युत व यांत्रिकी मजूर संस्थांना देण्यात येणारी 25 हजारापर्यंतची मर्यादा आता 50 हजार रु. करण्यात आली आहे. दोन वर्षाच्या अनुभवानंतर समाधानकारक कार्य असलेल्या विद्युत व यांत्रिक मजूर संस्थांना विनानिविदा 50 हजार रू.ची कामे 2 लाखापर्यंत अशा विविध सकारात्मक तरतुदी या निर्णयात असल्याची माहिती अतुल काळसेकर यांनी दिली.