Mon, Apr 22, 2019 15:58होमपेज › Konkan › मालवणात ‘एलईडी लाईट’ मासेमारी

मालवणात ‘एलईडी लाईट’ मासेमारी

Published On: Jan 20 2018 1:40AM | Last Updated: Jan 19 2018 10:52PMमालवण : वार्ताहर 

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीवरील समुद्रात बेकायदा सुरू असलेल्या एलईडी लाईट मासेमारी विरोधात मच्छीमार बांधवांमधून संतापाची लाट उसळल्यानंतर राज्य मत्स्य आयुक्तांनी एलईडी लाईटचा वापर करून मासेमारी करणार्‍या मच्छीमारांसह मासेमारी संस्थांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कारवाई करताना प्रसंगी संस्थेचे सर्व शासकीय लाभ बंद करण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश मत्स्य आयुक्त गोविंद बोडके यांनी कोकण किनारपट्टीवरील सर्व मत्स्य कार्यालयांना लेखी पत्राद्वारे दिले आहेत.

एलईडी लाईटचा वापर करून मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात आहे. या एलईडी लाईटमुळे सर्व प्रकारचे लहान-मोठे मासे मरून जातात. अशा पद्धतीची मासेमारी सुरू राहिल्यास समुद्रातील मत्स्य साठे संपुष्टात येतील, अशी भीती राज्याच्या मत्स्य आयुक्तांनीच आपला निष्कर्ष नोंदवताना व्यक्त केली आहे. 

मच्छीमारांच्या वतीने एका बाजूला एलईडी लाईट मासेमारी विरोधात आंदोलन छेडले जात आहे. परराज्यांतील मासेमारी बोटी सिंधुदुर्ग किनारपट्टीवर घुसखोरी करून शासनाने बंदी घातलेल्या एलईडी लाईट मासेमारी पद्धतीचा वापर करून मासळीची लयलूट करत आहेत. त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी मत्स्य विभागाची असताना मत्स्य खाते आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप मच्छीमार संस्था फेडरेशन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी केला आहे. मत्स्य सोसायटीकडे समुद्रातील सुरू असलेली बेकायदेशीर एलईडी लाईट मासेमारी रोखण्याची कोणतीही यंत्रणा नाही असेही धुरी यांनी संगितले. 

...तर मच्छीमार संस्थेवरच कारवाई होईल

मच्छीमार संस्थेचे सदस्य असणार्‍या गटांकडून एलईडी लाईटचा वापर करून मासेमारी होत असल्यास संबंधित संस्थेने त्यावर कारवाई करून एलईडी लाईट मासेमारी रोखावी. अन्यथा ज्या मच्छिमार संस्थेच्या गटांकडून एलईडी लाईट मासेमारी सुरू आहे त्या संस्थेवरच कारवाई केली जाणार आहे, असे आदेश मत्स्य आयुक्त गोविंद बोडके यांनी दिले आहेत.