Mon, Jun 17, 2019 02:15होमपेज › Konkan › कुणकेरीत आढळली पुरातन गुहा 

कुणकेरीत आढळली पुरातन गुहा 

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 20 2018 9:51PMसावंतवाडी: प्रतिनिधी

शहरापासून अवघ्या सात किमी वर असलेल्या  कुणकेरी भवानीवाडी येथील पांडुरंग गंगाराम सावंत यांच्या जागेत पुरातन गुहा असल्याचे नव्या  घराचा पाया खोदताना  आढळून आले. ही वार्ता हाहा म्हणता गावात व नंतर तालुक्यात पसरताच बघ्याची एकच गर्दी कुणकेरीत  झाली.

या गुहेचा वापर  पूर्वीच्या काळी गुप्तधन ठेवण्यासाठी केला जात असावा असा अंदाज तेथील ग्रामस्थांनी व्यक्‍त केला आहे. मात्र, कोणतेही गुप्त धन अथवा संपत्ती आढळून आली नाही.घराचा पाया खोदाई करणार्‍या भोसले-  सावंत  या घराण्याला संस्थानकालीन वारसा लाभला आहे. कुणकेरी भवानीवाडी येथील पाडुरंग सावंत हे आपले जुने घर पाडून त्याच जागेवर नवीन घर बांधत आहेत. त्यांच्या जुन्या घराने शंभरी ओलांडली आहे. याच घराच्या अगोदर जे घर होते ते संस्थानकालीन घर म्हणून ओळखले जात होते. त्या घराचे काही अवशेष शिल्लक ठेवूनच काही वर्षांपूर्वी हे घर बांधले होते.

पण आता नव्याने घराची बांधणी करत असताना खोदकाम करतानाच ही ऐतिहासिक गुहा आढळून आली आहे. ही गुहा साधारणत: साडेचार फूट खोल तर चार फूट रुंद आहे. गुहेला बंद करण्यासाठी झाकणासारखे दगडी आवरणही आहे. त्यामुळे संस्थानकालीन गुप्त धन ठेवण्यासाठीही अशा गुहेचा तेव्हा वापर केला जात असावा, असा अंदाजही  व्यक्‍त होत आहे. ही गुहा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.