Tue, Jul 23, 2019 06:58होमपेज › Konkan › एसटी स्थानकातच टेम्पो चालकाची दादागिरी!

एसटी स्थानकातच टेम्पो चालकाची दादागिरी!

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 12 2017 11:16PM

बुकमार्क करा

कुडाळ ः शहर वार्ताहर

एसटी बस चालकाने टेम्पोला  ओव्हरटेक करून हुलकावणी दिल्याचा आरोप  करीत आयशर टेम्पो  चालकाने कुडाळ नवीन एसटी स्टॅण्ड आवारात एसटी समोर बेकायदेशीर टेम्पो उभा करून बसचालकाला जाब विचारला. दोन्ही चालकांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर टेम्पो  चालक ‘टॉमी’ घेवून बस चालकाच्या  अंगावर धावला. मात्र उपस्थित  एसटी कर्मचार्‍यांनी त्याला वेळीच रोखल्याने प्रसंग  टळला.  अखेर टेम्पो  चालकाच्या माफीनाम्यानंतर हा विषय मध्यस्थीने  मिटवण्यात आल्याचे समजते. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.

सावंतवाडी आगाराच्या रत्नागिरी- पणजी एसटीच्या चालकाने  कसाल ते सिंधुदुर्गनगरी  दरम्यान सिमेंट वाहतूक करणार्‍या  आयशर  टेम्पोला  ओव्हरटेक केली.  त्यानंतर दोन्ही चालकांमध्ये शाब्दीक वाद झाला.  या नंतर  टेम्पो चालकाने बस मागोमाग येत नवीन एसटी  स्टॅण्डवर बस थांबली असता त्या बससमोर टेम्पो उभा करून  एसटीचालकाला जाब विचारला. तसेच टेम्पोतील टॉमी घेवून बस चालकाच्या अंगावर  धावला असता  कर्मचार्‍यांनी  त्याला वेळीच रोखले.

अन्य कर्मचार्‍यांनी टेम्पो चालकाला  धारेवर धरले.  एसटी आवारात बेकायदेशीर  टेम्पो लावल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी लावून धरली. आगारव्यवस्थपक दयानंद पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेत वाद शांत करण्याचा  प्रयत्न केला. पोलिस सायमन डिसोजा व अविनाश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही चालकांचे जबाब ऐकून घेतले. टेम्पोचालकाला पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले. टेम्पोचालक एसटीने ओव्हरटेक करून हुलकावणी दिल्याने आपल्या टेम्पोला अपघात  होता होता वाचला असे सांगत होता तर बसचालक असा कोणताही प्रकार झाला नसून फक्त ओव्हरटेक  केल्याचे सांगत होता. अखेर टेम्पो  चालकाच्या माफीनाम्यानंतर हा वाद मिटवण्यात आला.