Wed, Nov 21, 2018 19:44होमपेज › Konkan › सुनेने चोरी केल्याची सासूची पोलिसात तक्रार

सुनेने चोरी केल्याची सासूची पोलिसात तक्रार

Published On: Jan 03 2018 1:12AM | Last Updated: Jan 02 2018 10:23PM

बुकमार्क करा
कुडाळ ः वार्ताहर

घरातील घरगुती वापराच्या महत्त्वाच्या साहित्यासह सुमारे 1 लाख 17, 540 रू. किंमतीच्या वस्तू चोरून नेल्याप्रकरणी सासूने सुनेविरोधात तक्रार कुडाळ पोलिस स्थानकात दिली आहे. ही घटना निरूखे - तेर्सेवाडी येथे घडली.  यातील सुविधा सहदेव पालव या कामानिमित्त ठाणे येथे वास्तव्यास असतात. त्या 23 डिसेंबर 2017 रोजी आपल्या मुळ गावी निरूखे- तेर्सेवाडी येथे येऊन गेल्या. यावेळी त्यांनी  आपल्या घराला कुलूप लावले होते. यानंतर 1 जानेवारी 2018 रोजी त्या आपल्या निरूखे येथील घरी आल्या असता त्यांना आपल्या घराला वेगळेच कुलूप दिसले. त्यांनी घरात जावून पाहिले असता घरातील महत्त्वाच्या सर्व वस्तू चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्या.

यामध्ये 40 हजार रू. किंमतीचा फ्रीज, 5 हजार रू.चा लोखंडी कपाट, इलेक्ट्रॉनिक शेगडी, शिलाई मशिन यासह भांडे, डबे, खुर्च्या यासह सुमारे 1 लाख 17  हजार 540 रू. किंमतीचे सामान चोरीस गेले. त्याबाबत त्यांना मिळालेल्या माहितीनुसार  त्यांची सुन सौ. अनघा योगेश पालव व त्यांची काकी ज्योती  तेर्से यांनी टेम्पोतून हे सामान चोरून नेल्याचे त्यांना समजल्याची माहिती सुविधा पालव यांनी कुडाळ पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमूद केली आहे. यानुसार  कुडाळ पोलिस स्थानकात सौ. अनघा पालव व ज्योती तेर्से या दोघांविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सौ. अनघा पालव या विभक्त राहत आहेत.