Tue, Apr 23, 2019 23:32होमपेज › Konkan › वृक्षतोड करणारे तिघे चोरटे जेरबंद

वृक्षतोड करणारे तिघे चोरटे जेरबंद

Published On: Dec 19 2017 2:00AM | Last Updated: Dec 18 2017 10:23PM

बुकमार्क करा

कुडाळ ः प्रतिनिधी

माणगांव खोर्‍यातील मोरे जंगलातून  सागवान झाडाचे ओंढके वाहतूक करताना मोरे - धनगरवाडा येथील धोंडू सिंधु झोरे व सिंधु बाबू झोरे या पिता-पुत्राला काळोख्या रात्री पाठलाग करत  वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. यातील तिसरा संशयित प्रकाश लक्ष्मण कालवणकर फरार झाला. झोरे पिता-पुत्रांना रविवारी वेंगुलेर्र् न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तिसरा संशयित प्रकाश कालवणकर याला सोमवारी अटक करून झोरे पिता-पुत्रासह  कुडाळ न्यायालयात हजर केले असता तिनही आरोपींना 1 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली. या कारवाईमुळे लाकुड व्यावसायिकात खळबळ उडाली आहे. 

 मोरे गावातील जंगलात साग वृक्षाची मोठ्या प्रमाणात तोड झाल्याचे कुडाळचे वनक्षेत्रपाल पी.जी. कोकीतकर यांच्या निदर्शनास आले होते. या चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी त्यांनी गेले काही महिने सापळा रचला होता. दरम्यान शनिवार 16 डिसेंबर रोजी रात्री काही चोरटे या जंगलात  वृक्ष तोड करत असल्याची माहिती कोकितकर यांना  मिळताच त्यांनी वनपाल नारायण तावडे, वनरंक्षक सुनील भंडारे, संतोष यादव व दोन वनमजूरांचे पथक  मोरे जंगलात पाठविले.  

शनिवारी रात्री 11 च्या सुमारास संशयित झोरे पिता-पुत्र व प्रकाश कालवणकर हे तोडलेल्या सागवान ओंडक्यांची वाहतूक करताना या  पथकास दिसून आले.  वनकर्मचार्‍यांना पाहून त्यांनी पळण्यास सुरुवात केली. मात्र वनकर्मचार्‍यांनी अंधार्‍या रात्री  बॅटरीच्या प्रकाशात पाठलाग करत झोरे पिता-पुत्राला ताब्यात घेतले व त्यांच्या कडील हत्यारे ताब्यात घेत जाब-जबाब घेतले. मात्र प्रकाश कालवणकर हा अंधाराचा फायदा घेत पळून गेला. कारवाईनंतर मध्यरात्री कोकितकर यांनी घटनास्थळी  खासगी गाडीने धाव घेत दोन्ही संशयितांना वनविभागाच्या आंबेरी तळावर आणले.

 दरम्यान फरार प्रकाश कालवणकरला सोमवारी अटक केली. या तिनही संशयितांना सोमवारी कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 1 जानेवारी 2018 पर्यंत न्यायालयीन कस्टडी सुनावली. वनक्षेत्रपाल पी.जी. कोकितकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नारायण तावडे, वनरक्षक सुनील भंडारी, संतोष यादव, प्रियांका पाटील, गुरूनाथ देवळी, सावळा कांबळे, सूर्यकांत सावंत, वनमजूर  लक्ष्मण आगलावे, रामचंद्र तेली यांनी केली.