Sun, May 26, 2019 09:49होमपेज › Konkan › निवडणुकांचे वारे : कुडाळमध्ये शिवसेना वाढतेच आहे!

निवडणुकांचे वारे : कुडाळमध्ये शिवसेना वाढतेच आहे!

Published On: Feb 12 2018 1:58AM | Last Updated: Feb 11 2018 9:31PMकुडाळ : गणेश जेठे

कुडाळ आणि मालवण तालुक्याचा समावेश असणारा कुडाळ विधानसभा मतदारसंघ हा तसा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असणारा मतदारसंघ. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा हा मतदारसंघ. गेल्या 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे युवा आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा 10 हजार 376 मतांनी पराभव केला. त्यामुळे आ.नाईक हे महाराष्ट्रात जायंट किलर म्हणून चर्चेत आले. येत्या वर्षात 2019 सालामध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीत अर्थातच शिवसेनेचे उमेदवार आ. नाईक हेच असणार आहेत. मात्र, राणे स्वत: पुन्हा या निवडणुकीत उतरणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एक मात्र खरे आहे, या मतदारसंघात निवडणूक रिंगणात उतरण्याची अनेकांची तयारी पाहता या मतदारसंघातील लढत ही बहुरंगी होणार आहे. 

गेल्यावेळची विधानसभा निवडणूक 2014 सालच्या ऑक्टोबर महिन्यात झाली. तत्पूर्वी चार महिने अगोदर झालेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचे सुपूत्र माजी खा.नीलेश राणे यांचा मोठ्या मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे विधानसभा निवडणूक राणे यांच्यासाठी कुडाळमधून कठीण जाणार असा अंदाज राजकीय अभ्यासकांनी वर्तविला होता. 2009 सालच्या निवडणुकीत आ.वैभव नाईक हे नारायण राणे यांच्या विरोधात कुडाळमध्येच 25 हजार मतांनी पराभूत झाले होते. ही लढत जेव्हा 2014 साली पुन्हा झाली तेव्हा वैभव नाईक यांच्यासाठी वातावरण अधिक पोषक होते. संपूर्ण महाराष्ट्राचे या लढतीकडे लक्ष लागले होते. 

आता शिवसेनेचे उमेदवार म्हणून आ. वैभव नाईक निवडणूकपूर्व तयारी जोरदार करत आहेत. गावागावात जावून संघटना बांधणे आणि ती घट्ट ठेवणे यासाठी जे जे करणे आवश्यक आहे ते सर्वकाही करण्याची स्ट्रॅटेजी त्यांनी अवलंबिली आहे. परंतु सत्तेचे साईड इफेक्ट होतच असतात. उंचावलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर लोकांची नाराजी वाढू शकते. त्यामुळे ही नाराजी समोर आली तर नाईक यांना अधिक कडवी झुंज विरोधी उमेदवाराशी करावी लागेल. त्यातही लोकांना उत्सुकता आहे ती ही की राणे पुन्हा कुडाळमध्ये निवडणुकीत उतरणार की नाहीत? सध्यातरी राणे यांनी या पार्श्‍वभूमीवर कोणतेही घोषणा केलेली नाही. स्वाभिमान पक्षामार्फत निवडणुका लढविणार एवढेच संकेत त्यांनी दिले आहेत. पण काही राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की राणे या निवडणुकीत उतरूही शकतात. जर ते लोकसभा निवडणुकीत उतरले नाहीत तर कुडाळमधून निवडणूक लढवू शकतात.  राणे यांनी निवडणूक नाही लढविली तर स्वाभिमान पक्षाचा उमेदवार कोण असेल? अशी चर्चा सुरू आहे. मध्यंतरी माजी खा.निलेश राणे हे कुडाळमधून विधानसभा निवडणुकीत उतरू शकतात अशी चर्चा होती. परंतु ते लोकसभा निवडणूक लढले तर कुडाळमधून विधानसभेसाठी ते निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता कमीच आहे असेही सांगितले जाते. कदाचीत विधानसभा निवडणुकीत उतरायचेच झाले तर ते चिपळुणमधूनही निवडणूक लढवतील, कारण तिथे त्यांचे बर्‍यापैकी संघटन आहे, असा अंदाज व्यक्‍त केला जातो. परंतु इथे राणे निवडणुकीत नाही उतरले तर स्वाभिमान पक्षाचा कुडाळ मतदारसंघातील उमेदवार कोण असेल असा जेव्हा प्रश्‍न उपस्थित केला जातो तेव्हा सतीश सावंत यांचे नाव पुढे येते. सतीश सावंत हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत, त्याशिवाय जिल्हा परिषदेवर ते चौथ्यांदा निवडून आले आहेत. आता तर त्यांचा जि.प.मतदारसंघ कुडाळ तालुक्यातील आंब्रड हा आहे. गेल्या महिन्यात त्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी जिल्हाभरात साजरा झाला, तेव्हा त्यांच्या कार्यक्रमांमध्ये ‘सतीश सावंत यांनी आता आमदार बनावे’ अशी सदिच्छा अनेकांनी व्यक्‍त केली. त्याचीही चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात झाली होती.  सतीश सावंत यांच्याबरोबरच इतर काही नावेही चर्चेत आहेत. 
गेल्यावेळी मालवणचे बाबा मोंडकर हे भाजपचे या मतदारसंघातील उमेदवार होते. आता भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर हे कुडाळमधून निवडणूक लढविणार, अशी जोरदार चर्चा आहे. अलिकडच्या काळात कुडाळ तालुक्यातील आकारीपड जमीन, ओरोस नगरपंचायत हे प्रश्‍न त्यांनी हाताळले आहेत. ते या मतदारसंघात राबवित असलेल्या विविध उपक्रमांच्या पार्श्‍वभूमीवर काळसेकर हे निवडणुकीत उतरण्याचा अंदाज बांधला जात आहे. गेल्यावेळच्या निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघातून काळसेकर भाजपचे उमेदवार असणार अशी बातमी आली होती, परंतु काँग्रेसमधून बाहेर पडून पहिल्यांदा राष्ट्रवादीत आणि त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करू शकणार्‍या राजन तेली यांना भाजपकडून सावंतवाडीची लढत लढण्याची ऑफर देण्यात आली. राजन तेली तेथील भाजपचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले. यावेळीही तेली सावंतवाडीतून निवडणूक लढविणार आहेत.  त्यामुळे काळसेकर कुडाळमधून रिंगणात उतरतील अशी दाट शक्यता आहे.

कुडाळमधील ही निवडणूक बहुरंगी होईलच त्याशिवाय ती अटीतटीचीही होईल. गेल्यावेळी काँग्रेसमधून निवडणूक रिंगणात उतरलेल्या नारायण राणे यांना 60 हजार आणि शिवेसेनेचे  वैभव नाईक यांना 70 हजार मते मिळाली. राणे यांचा बालेकिल्ला समजला जाणार्‍या मालवण तालुक्यातही वैभव नाईक यांना 2300 चे मताधिक्य मिळाले होते. भाजपला या मतदारसंघात केवळ 4819 मते मिळाली होती. ही आकडेवारी लक्षात घेता शिवसेना आणि काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या राणे समर्थक यांचा स्वाभिमान पक्ष यांच्यात कडवी झुंज होईल यात शंका नाही. अर्थात भाजपला खूप मोठी ताकद या मतदारसंघात वापरावी लागेल. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या भागात शिवसेना वाढते आहे. गेल्यावर्षी झालेल्या जि.प.पं.स. निवडणुकीत शिवसेनेने मोठे यश मिळविले होते. कुडाळमध्ये पंचायत समितीवर सत्ता मिळविली. जि.प.चे अनेक सदस्य निवडून आणले. अलिकडे झालेल्या ग्रा.पं. निवडणुकीतही शिवसेनेने बर्‍यापैकी यश मिळविले. त्यामुळे शिवसेना या मतदारसंघात वाढते आहे. इतर पक्षांना शिवसेनेशी कडवा सामना करावा लागणार आहे. 

काँग्रेसचा उमेदवार कोण असेल?
राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसकडून कुडाळ विधानसभा मतदारसंघात उमेदवार उतरविला जाईल. काँग्रेसचा एक मतदारवर्ग या मतदारसंघात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला सोबत घेवून काँग्रेस या ठिकाणी निवडणुकीत उडी घेवू शकते. मात्र, काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याचा अंदाज आत्ताच बांधता येणार नाही. कदाचित इतर पक्षातील एखाद्या नाराज ताकदवान उमेदवाराला या मतदारसंघातून उमेदवारीची ऑफर दिली जावू शकते. त्यावरच काँग्रेसचा उमेदवार कोण असेल या प्रश्‍नाचे उत्तर मिळू शकते.