कुडाळ : शहर वार्ताहर
पणदूर-घोडगे मार्गावर आवळेगाव चौथा मैल येथे शुक्रवारी सकाळी एस.टी. बस व जेसीबी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बसमधील 13 प्रवासी जखमी झाले. जखमींवर कडावल प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय व खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. जेसीबी बसवर आदळताच बसमधील प्रवाशी हादरले. सुदैवाने या अपघातात बस पलटी होता होता वाचल्याने जीवितहानी टळली.
कुडाळ आगाराची घोडगे-कुडाळ बस सकाळी 11.30 वा.च्या सुमारास आवळेगाव चौथा मैल येथे आली असता समोरून कडावलच्या दिशेने जाणारा जेसीबी वळणाचा अंदाज न आल्याने थेट बस चालकाच्या बाजूकडे मधोमध आदळला. जेसीबीच्या समोरच्या ब्लेडने बसच्या डिझेल टाकीजवळून मागील चाकापर्यंत पत्रा पूर्णतः कापून गेला तसेच पाटे व चाकांचा रॉड तुटून गेला. शिवाय जोराच्या धक्क्यामुळे बस पलटी होता होता थोडक्यात बचावली. अपघात होताच बसमधील प्रवासी हादरले. अपघातग्रस्त बसमधून 56 प्रवासी प्रवास करत होते.
यातील जखमी आत्माराम अर्जुन सावंत (वय 70, रा. डिगस), नवलू कोंडू झोरे (70, डिगस), रंजना रवींद्र राऊळ (32, रा. तेंडोली - आदोसेवाडी), ऐश्वर्या रवींद्र राऊळ (13, रा. तेंडोली- आदोसेवाडी), रिया मोहन देसाई (27, रा. आवळेगाव), निवृत्ती कृष्णा राऊळ (65, शिवापूर) व मन्नुकुमार विश्वकर्मा (32, जांभवडे) या सात जणांना कडावल प्रा. आ. केंद्र येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले तर अनिता अरुण माणगावकर (40, रा. कडावल), विजया विष्णू परब (32, रा. डिगस), तारामती हरिश्चंद्र भांबाळे (48, रा. डिगस) व महादेव परब (56, रा. डिगस) या चार जणांना ओरोस येथे दाखल केले.
9 जखमींना कुडाळ एस.टी. आगाराने आर्थिक मदत दिल्याची माहिती आगार प्रशासनाकडून देण्यात आली. जि. प. सदस्य अमरसेन सावंत, पं.स.सदस्या शीतल कल्याणकर, सरपंच सुनील सावंत, किशोर मर्गज, राजू सावंत, दिलीप सावंत, पप्पू पालव, सुजन (पप्पू) पावसकर आदींसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. अपघातादरम्यान रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
tags : Kudal,news,S.T., JCB ,Accident, 13 passengers, injured,
May 06 2018 1:09AM
May 06 2018 1:09AM
May 06 2018 1:09AM
May 06 2018 1:09AM
May 06 2018 1:09AM
May 06 2018 1:09AM