Tue, May 21, 2019 00:06होमपेज › Konkan › कोकणला विसरणार नाही : ना. प्रभू

कोकणला विसरणार नाही : ना. प्रभू

Published On: Apr 21 2018 1:00AM | Last Updated: Apr 20 2018 11:28PMसावर्डे : वार्ताहर

देशातील लाखो महिलांचा मृत्यू धुराच्या त्रासामुळे होत आहे. महिलांना गॅस दिल्यास जंगलतोड कमी होईल. घरातील मोठ्या प्रमाणात होत असलेले प्रदूषण थांबेल, जलद स्वयंपाक करता येईल. महिला निरोगी जीवन जगतील म्हणून आजचा दिवस हा ‘उज्ज्वल दिवस’ आहे. ‘उज्ज्वला’ योजनेमुळे महिलांना चांगले दिवस येतील, देशाचे नेतृत्व करत असताना कोकणला अर्थात माझ्या कर्मभूमीला मी कधी विसणार नाही, असे केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू म्हणाले. सावर्डे येथील भाऊसाहेब महाडिक सभागृहात लाभार्थीधारक महिलांना एलपीजी गॅस आणि शेगडी वितरण कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना प्रभू म्हणाले, चूल आणि मुलामध्ये अडकलेल्या महिलांची प्रगती म्हणावी तितकी झाली नाही. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘उज्ज्वला’ योजनेची कल्पना मांडली. जगाच्या इतिहासात अल्पावधीमध्ये ही योजना प्रत्यक्षात अंमलात आणली. ‘उज्ज्वला’ योजनेद्वारे देशभरात गॅस कनेक्शन सगळ्यांना देऊन नवीन जीवनाचा आनंद घेण्यासाठी त्याला रस्ता दाखवणे, असे या योजनेचे स्वरुप आहे. एखादा माणूस आजारी पडला तर घर हतबल होते. कोकणी माणूस अशा वेळी एखादी गोष्ट विकून त्याला सामोरे जातो. प्रत्येक माणसाला सुखी जीवन जगण्यासाठी सरकारने ‘आयुष्यमान’ योजना आणली. महिलांना आज गॅस योग्य आणि अचूकवेळी मिळाला आहे. महिलांना स्वयंरोजगाराची संकल्पना समजली पाहिजे. मी देशातील 29 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांमध्ये अनेक योजना राबवितो. मला देशाच्या विकासासाठी झगडावयाचे आहे. मी निवडणुकीसाठी नाही सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी ऊभा आहे. 

चिपळूण तालुका विचारवंतांचा प्रगल्भ तालुका आहे. याठिकाणी लवकरच रेल्वेचा कारखाना होणार आहे. मी  रेल्वे मंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी देशातील 90 टक्के लोकांनी त्याचे स्वागत केले. पंचवीस वर्षांत कोकण रेल्वेत जी कामे झाली नव्हती ती कामे गेल्या काही महिन्यांत मार्गी लावली आहेत. महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून संधी मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहूया.  शासनाच्या कोणत्याही योजनेत अडचण आल्यास  संपर्क साधा, त्यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक करवाई करु, असेही ना. प्रभू म्हणाले. 

यावेळी शेखर निकम, उमा प्रभू, भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, प्रमोद अधटराव, दीपक पटवर्धन, एलपीजी जनरल मॅनेजर पी. के. कोठारे, प्रांताधिकारी कल्पना जगताप-भोसले, तहसीलदार जीवन देसाई, डॉ. सुभाष देव, राजश्री विश्‍वासराव, गिरीष कोल्हटकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

Tags : Konkan, will not forget, Minister Suresh Prabhu, Konkan news,