Sat, Jul 20, 2019 21:17होमपेज › Konkan › कोकणासह पश्‍चिम किनारपट्टी होणार सुरक्षित!

कोकणासह पश्‍चिम किनारपट्टी होणार सुरक्षित!

Published On: Jul 05 2018 1:38AM | Last Updated: Jul 04 2018 10:29PMरत्नागिरी : प्रतिनिधी

अपुरा कर्मचारी वर्ग असलेली सागरी पोलिस ठाणी आणि मर्यादा असलेली सागरी गस्त यामुळे अद्यापपर्यंत कोकण किनारपट्टीसह पश्‍चिम किनारपट्टी अद्यापही असुरक्षितच आहे. परंतु, आता कोकणासह देशाच्या पश्‍चिम किनारपट्टीची सुरक्षा अधिक बळकट होणार आहे. तटरक्षक दलाच्या एअर ऑपरेशन्स अर्थात हवाई दळणवळणासाठी आवश्यक मिरजोळे विमानतळाच्या धावपट्टीच्या बळकटीकरणाचे काम पूर्ण झाले असून पावसाळ्यानंतर सुरक्षा चाचणी झाल्यानंतर तटरक्षक दलाच्या विमानांसाठी हे विमानतळ खुले होणार आहे. त्यामुळे समुद्राची हवाई गस्त सुरू करण्यात येणार आहे. 

पश्‍चिम किनारपट्टीवर आणि समुद्रामध्येही देशविरोधी होणार्‍या कारवायांवर नियंत्रण व निरीक्षण ठेवण्यासाठी हवाई सर्वेक्षणाचा मु्द्दा पुढे आला. त्यामुळे रत्नागिरीतील मिरजोळे हे नागरी उड्डाणासाठी एकेकाळी वापरले जाणारे विमानतळ तटरक्षक दलाने ताब्यात घेतले. त्यानंतर गेले आठ वर्षे विमानतळ बळकटीकरणासह विविध कामे येथे सुरू होती. यामध्ये विमानतळाच्या धावपट्टीचे बळकटीचे काम प्रगतीपथावर होते. हे काम पूर्ण झाले असून धावपट्टीच्या लांबीमध्ये आवश्यक वाढ करण्यात आली आहे. धावपट्टीचे काम पूर्ण झाले असले तरीही अद्याप त्याच्या सुरक्षेची चाचणी पूर्ण झालेली नाही, अशी माहिती तटरक्षक दलाचे कमांडंट एस. आर. पाटील यांनी दिली. 

ही चाचणी पावसाळ्यानंतर सप्टेंबरमध्ये होणार असून सुरक्षेच्या दोन चाचण्या पूर्ण झाल्या की तटरक्षक दलाच्या विमानांसाठी हे विमानतळ सज्ज होणार आहे. 26 नोव्हेंबर 2008 मध्ये  मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशाच्या किनारपट्टीच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुढे आला. सन 1993 मधील बॉम्ब स्फोटासाठी आलेले आरडीएक्स मुंबईत पोहोचवण्यासाठी कोकण किनारपट्टीचा उपयोग करण्यात आला होता. त्यानंतर सागरी पोलिस ठाणी स्थापन करण्यात आली होती. तर सागरी सुरक्षेसाठी कस्टम, 

मत्स्य व्यवसाय खाते आणि पोलिस यांच्या संयुक्‍त विद्यमाने सागरी गस्तही सुरू करण्यात आली होती. 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेचा हा मुद्दा पुन्हा चर्चिला गेला. त्यावेळी पश्‍चिम किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक भक्‍कम करण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी बेस कॅम्प असावा, हाही मुद्दा त्यावेळी चर्चिला गेला होता. त्यानंतर केंद्र स्तरावर हालचाली होऊन पश्‍चिम किनारपट्टीवरील महत्त्वाचा आणि मध्यवर्ती असलेल्या रत्नागिरीमध्ये काम सुरू करण्यासाठी सन 2010 पासून तटरक्षक दलाच्या हालचाली सुरू झाल्या. तटरक्षक दलासाठी धावपट्टी सुरू झाल्यानंतर येथे सागरी हवाई सुरक्षा गस्तीसह पश्‍चिम किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार असून पश्‍चिम किनारपट्टी बळकट होणार आहे.