Wed, Jan 29, 2020 23:55होमपेज › Konkan › 'कोकणातील शिक्षक भरतीत स्थानिकांनाच सामावून घ्या'

'कोकणातील शिक्षक भरतीत स्थानिकांनाच सामावून घ्या'

Published On: Jun 26 2019 8:03PM | Last Updated: Jun 26 2019 5:20PM
रत्नागिरी : प्रतिनिधी

सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरतीमध्ये कोकणातील स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी अधिवेशनात केली. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व पालघर हे जिल्हे अत्यंत दुर्गम व डोंगराळ भागात वसलेले आहेत. या जिल्ह्यातील अनेक तरूणांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून डी.एड./बी.एड अभ्यासक्रमांचे शिक्षण पूर्ण केले आहे. परंतु, गेल्या दहा वर्षांपासून हे सर्व तरूण नोकरीच्या प्रतीक्षेत असून सद्यस्थितीत मिळेल त्या रोजगारावर आपले पोट भरत आहेत. आठ वर्षांच्या शिक्षक भरतीच्या स्थगितीनंतर सध्या शासनाकडून शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

सन 2010 मध्ये झालेल्या भरतीवेळी रत्नागिरी जिल्ह्यातील 1157 जागांमध्ये केवळ 37 स्थानिकांना सामावून घेण्यात आले होते आणि हीच स्थिती कोकणातील अन्य जिल्ह्यामध्ये होती. त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण होते.

आधी जिल्हास्तरावरून होणारी भरती राज्यस्तरावरून झाल्याने त्याचा फटका कोकणातील डी.एड./बी.एड धारकांना बसला आणि हजारो तरूण नोकरीविना राहिले. तेव्हापासून गेली 8 वर्ष उपोषण, मोर्चा यासारख्या विविध मार्गाने कोकणातील स्थानिक सुशिक्षित बेरोजगार शासनाचे लक्ष वेधत आहेत. आता होणाऱ्या भरतीमध्ये 70 टक्के स्थानिकांना सामावून घेण्याची मागणी बेरोजगार तरूणांच्या संघटनांनी केली असून, ती अत्यंत रास्तदेखील आहे.

सन 2010 ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी 70 टक्के स्थानिकांना सामावून घेण्याबाबत धोरणात्मक निर्णय व्हावा. कोकणातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना न्याय द्यावा, अशी मागणी कोकणचे नेते, गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांनी बुधवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्दयाद्वारे केली. यामुळे जिल्ह्यातील डी.एड./बी.एडधारकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.