Thu, Apr 25, 2019 13:28होमपेज › Konkan › कोकणवासियांनी रिफायनरी प्रकल्प स्वीकारावा

कोकणवासियांनी रिफायनरी प्रकल्प स्वीकारावा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

रिफायनरी प्रकल्पाबाबत मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरवण्यात आले आहेत. रिफायनरीमुळे कोकणच्या सौंदर्यावर कोणताही परिणाम होणार नाही. देशातील 23 रिफायनरी जनतेला आज पिकनिक स्पॉट वाटू लागले  आहेत. येथील रिफायनरीमधूनही एक थेंबही पाणी बाहेर सोडले जाणार नाही. त्यामुळे या प्रकल्पाबाबतची भीती स्थानिकांनी मनातून काढून टाकावी, असे आवाहन रत्नागिरी रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल कंपनीचे महाव्यवस्थापक मोहन मेनन यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले

यावेळी कंपनीचे प्रवक्‍ते अनिल नागवेकर आणि अजित मोरये उपस्थित होते. यावेळी  मेनन यांनी सांगितले की, रत्नागिरी रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (आरआरपीसीएल) हा प्रकल्प देशाच्याद‍ृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. जो देश आणि देशातील नागरिकांच्या भविष्यातील ऊर्जा सुरक्षिततेसाठी बनवण्यात आलेला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तीन प्रमुख कंपन्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हे या महा प्रकल्पाचे प्रमोटर्स आहेत. तीन लाख कोटींची गुंतवणूक असलेला हा महाप्रकल्प एकंदर आर्थिक विकासाद्वारे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल घेऊन येईल.

या प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्यावर तो महाराष्ट्र राज्याच्या जीडीपीमध्ये जवळपास 10 ते 15 टक्के आणि देशाच्या जीडीपीमध्ये 2 टक्के वृद्धीचे योगदान देईल. या प्रकल्पामध्ये बांधकाम टप्प्यादरम्यान 1,50,000 पेक्षा अधिक लोकांना रोजगार प्राप्‍त होईल आणि प्रकल्पाची उभारणी झाल्यावर जवळपास 20,000 लोकांना थेट नोकरी लाभेल तर अप्रत्यक्षपणे रोजगार प्राप्‍त होणार्‍यांची संख्या लाखोंच्या घरात असेल.प्रकल्पाच्या सभोवताली राहणार्‍या लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी स्मार्ट सिटी विकसित करण्याची योजना आहे. रस्ते संपर्क व्यवहार यंत्रणा आणि इतर जल व ऊर्जा सुविधादेखील विकसित करण्यात येतील, ज्या स्थानिक लोकसंख्येला प्रचंड प्रमाणात लाभदायक ठरतील. या महा प्रकल्पामध्ये वाहतुकीच्या पायाभूत सुविधा, बंदर सुविधांचा विकास आणि हवाई जोडणीच्या विकासासाठी प्रचंड क्षमता आहे.

या रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पामध्ये पालन करण्यात येणारी सुरक्षा मानके ही जगभरामध्ये पालन करण्यात येणार्‍या अत्यंत कठोर मानकांचीही पूर्तता करतात. सागरी सुविधांसाठी अग्‍नी सुरक्षितता आणि किनार्‍यावरील सुरक्षिततेसाठी अत्यंत आधुनिक सुविधा प्रदान करण्यात येतील. तशाच प्रकारे या प्रकल्पाच्या कारणास्तव संपूर्ण क्षेत्राची सुरक्षा लक्षणीय प्रमाणात वाढवण्यात येईल. अशा प्रकारे या प्रकल्पामुळे प्रदेशासाठी आणि येथील लोकसंख्येसाठी सुरक्षिततेबाबत कोणताही धोका असणार नाही.

या रिफायनरीमधून कोणतेही टाकावू पाणी बाहेर टाकले जाणार नाही. रिफायनरीमध्ये वापरलेल्या पाण्यावर पुन:र्प्रक्रिया करून ते पाणी रिफायनरीमध्येच वापरले जाईल. त्यामुळे पाण्याच्या प्रदूषणाचा प्रश्‍नच निर्माण होणार नाही. रिफायनरीमधून बाहेर पडणारी उत्पादनेदेखील सर्वात आधुनिक अशा बीएस-व्हीआय प्लस निकषांची पूर्तता करतील जे जगभरातील सर्वात आधुनिक मापदंड आहे, त्याची रचना ऑटोमोबाईल्स आणि इंडस्ट्रिजमधील वापरात किमान उत्सर्जनासाठी करण्यात आलेली आहे.

प्रकल्पामध्ये पेट्रोकेमिकल उत्पादनांचीही निर्मिती होईल, ज्याचा वापर फर्निचर, टेक्सटाईल्स, ऑटोमोबाईल्स, पॅकेजिंग, होम अप्लायन्सेस अशा सर्वसामान्य लोकांद्वारे वापरण्यात येणार्‍या मूलभूत वस्तूंच्या निर्मितीसाठी होतो. आरआरपीसीएल हे किमान 30 टक्के क्षेत्र हरित पट्टा म्हणून विकसित करेल आणि रिफायनरीच्या परिसरात एक लाखांपेक्षा अधिक हापूस आंब्यांची आणि काजूची रोपे लावण्यात येतील. तसेच आंबा व काजू यांसह या प्रदेशातील कृषी पिकांवर रिफायनरीच्या कार्याचा कमीत कमी परिणाम होईल, असे मेनन म्हणाले.

Tags : Konkan, Konkan News, Konkan, residents, accept, refinery projects


  •