Thu, Dec 12, 2019 08:17होमपेज › Konkan › कोकण रेल्वे प्रवाशांना ‘विनायक’ पावला!

कोकण रेल्वे प्रवाशांना ‘विनायक’ पावला!

Published On: Jun 30 2019 1:08AM | Last Updated: Jun 29 2019 10:53PM
कुडाळ : शहर वार्ताहर

कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्‍या कोकणकन्या व मांडवी एक्सप्रेस या गाड्यांचे प्रत्येकी दोन जनरल डबे (बोगी) कमी केल्याने रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. याची दखल  खा. विनायक राऊत यांनी घेत मध्य रेल्वेचे महाप्रबंधक ए.के.गुप्ता यांच्याकडे या गाड्यांना पूर्वीप्रमाणेच चार जनरल डबे जोडावेत अशी मागणी केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत श्री.गुप्ता यांनी ही मागणी मान्य करीत सोमवार 1 सप्टेंबरपासून याबाबतची कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही खा.राऊत यांना दिली. श्री.गुप्ता यांच्या ग्वाहीमुळे कोकण रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोकण रेल्वेच्या कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेस, मेंगलोर एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस तसेच जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्यांच्या समस्यांबाबत मध्य रेल्वेचे महाप्रबंधक ए.के.गुप्ता यांच्या दालनात शिवसेना सचिव खा. विनायक राऊत यांच्या सूचनेप्रमाणे शनिवारी बैठक झाली. या बैठकीला मध्य रेल्वेचे ए.के.गुप्ता व कोकण रेल्वेचे चीफ कमर्शियल मॅनेजर एल.के.बर्मा, चीफ ऑपरेशन मॅनेजर व्ही.सी.सिन्हा उपस्थित होते. अधिकाधिक कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांना सोयीस्कर पडणार्‍या कोकणकन्या व मांडवी एक्सप्रेस या दोन गाड्यांना पूर्वीप्रमाणेच चार जनरल डबे जोडण्याची मागणी खा.राऊत यांनी केली. ही मागणी मान्य करीत, त्याची पूर्तता 1 सप्टेंबर पासून करण्यात येईल अशी ग्वाही मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री. गुप्ता यांनी दिली.

त्याचबरोबर तुतारी एक्स्प्रेसला जादा डबे जोडावेत ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होत आहे. गणेश चतुर्थीपूर्वी तुतारीला जादा डबे जोडावेत, अशी मागणी खा. राऊत यांनी महाप्रबंधक यांच्याकडे 
केली. 

प्रवाशांची वाढती संख्या पाहता तुतारी गाडीलासुद्धा अधिक डबे (कोच) जोडण्याची मागणी मान्य करण्यात आली असून दादर रेल्वे स्थानकाच्या मुख्य रेल्वे लाईनवरुन ही गाडी सोडण्यात येईल व दादर प्लॅटफॉर्म वर 10 ते 15 मिनिटे ही गाडी थांबेल.तसेच मेंगलोर एक्स्प्रेसलासुद्धा अधिक डबे जोडण्यात येतील असे आश्‍वासन मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री.गुप्ता यांनी खा.राऊत यांना दिले. खा. राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे कोरे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.