Thu, Jun 20, 2019 07:16होमपेज › Konkan › ‘कोकण पदवीधर’साठी उद्या मतदान

‘कोकण पदवीधर’साठी उद्या मतदान

Published On: Jun 23 2018 10:44PM | Last Updated: Jun 23 2018 9:50PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा जाहीर प्रचार शनिवारी संपला आहे. यासाठी सोमवारी मतदान होणार असून, राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला, शिवसेनेचे संजय मोरे आणि भाजपचे अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. तिन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जबरदस्त मेहनत घेतली. सोमवारी सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार असून, गुरुवारी मतमोजणी होणार आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघात 1 लाख 4 हजार 264 मतदार असून, रत्नागिरी जिल्ह्यात 16 हजार 222 मतदार आहेत. या निवडणुकीत शिवसेना, भाजपची युती नसल्याने रंगत आली आहे. त्यामुळेच ही निवडणूकसुद्धा प्रतिष्ठेची झाली असून राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपने तगडे उमेदवार दिले आहेत. त्याचबरोबर या निवडणुकीत प्रचार यंत्रणा मागील निवडणुकीपेक्षा वेगळी होती.

प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी मतदार संघातील आपल्या वर्चस्वानुसार प्रचार केला. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर शिवसेना, भाजपकडून पदवीधरांचे मेळावे आयोजित करण्यात आले. राष्ट्रवादीकडून कार्यकर्त्यांसह लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्‍यांकडून मतदारांच्या छुप्या बैठका घेण्यात आल्या. त्याचबरोबर तिन्ही पक्षांकडून सामाजिक माध्यमांचाही जोरदार वापर करण्यात आला.

कोकण विभाग मतदार संघामध्ये पालघर जिल्ह्यात 16 हजार 982, ठाणे 45 हजार 834, सिंधुदुर्ग 5 हजार 308 असे 1 लाख 4 हजार 264 मतदार आहेत. मतदार असलेल्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.