Sun, Aug 25, 2019 03:46होमपेज › Konkan › कोकणातील लोककला ‘राजाश्रयाच्या’प्रतीक्षेत

कोकणातील लोककला ‘राजाश्रयाच्या’प्रतीक्षेत

Published On: Aug 30 2018 1:19AM | Last Updated: Aug 29 2018 8:03PMकणकवली : रोशन तांबे

लोककलेद्वारे विविध विषयांवर जनजागृती करून ग्रामीण भागातील कलाकारांनी समाजात आदराचे स्थान निर्माण केले होते.मात्र, आता मोबाईल, संगणक, इंटरनेटमुळे करमणुकीची साधने कमी झाली असून लोककला हळूहळू संपुष्टात येऊ लागल्याचे चित्र  आहे. लोककलेद्वारे जनजागृती करणारे कलाकार सध्या बेकार आहेत.त्यामुळे कोकणातील लोककलांना  राजाश्रय मिळणे गरजेचे असून यासाठी व्यापक जनजागृतीची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.त्याचप्रमाणे सिंधुदुर्गात एकही बंदिस्त सुसज्ज असे एकही नाट्यगृह नसल्यामुळे रसिकांनाही संगीत नाटकांचा व अन्य कलांचा मनमुराद आस्वाद घेण्यास मिळत नाही.

जाखडी, भजने, टिपर्‍या, भारूड, देवीचा गोंधळ, दशावतार, नमन, लावणी, तमाशा आदी प्रकारामुळे महाराष्ट्रातील लोककला जिवंत राहिली आहे. लोककलेला व्यावसायिक स्वरूप येऊ नये याची काळजी ज्येष्ठ कलाकारांनी घेतली होती. मंडळे, पथकांमार्फत लोककला सादर करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याशिवाय अन्य कोणत्याही पर्याय आता शिल्‍लक राहिलेला नाही. नमनाची लोककला हळूहळू संपुष्टात येवू लागली आहे. काही मंडळींनी झांजगी नमनाद्वारे ही लोककला टिकवून ठेवली आहे. प्रवासावरील खर्च, कलाकारांचे मानधन यामुळे एका रात्रीच्या नमनासाठी हजारो रूपये खर्च करावे लागतात. आयोजकांना हा खर्च परवडत नसल्याने त्यांनी लोककलेचा अन्य पर्याय स्वीकारला आहे.

सिंधुदुर्गात बंदिस्त नाट्यगृह नसल्याने रसिकांना लोककलेच्या आस्वादातून दूर रहावे लागत आहे. संगीत नाटक पाहणार्‍या रसिकांची संख्या सिंधुदुर्गात कमी नाही.मात्र, नाट्यगृहाअभावी या रसिकांच्या आस्वादावर विरजण पडत आहे.मालवण येथे मच्छींद्रनाथ कांबळी नाट्यगृह  उभारणीची घोषणा आ.वैभव नाईक यांनी केली होती.त्यानुसार यावर्षीच्या अर्थसंकल्पात निधीची तरतुदही करण्यात आली आहे.मात्र, नाट्यगृह उभारणीस अद्याप तरी सुरुवात झालेले दिसत नाही.  निवडणुकीच्या काळात राजकीय फायद्यासाठी राजकीय लोकप्रतिनिधी अनेक घोषणा करतात यामध्ये सुसज्ज नाट्यगृह उभारणीची घोषणाही अनेकवेळा करण्यात आल्या.या घोषणा केवळ घोषणाच राहिल्या असून कोकणातील कला पुन्हा जिवंत करण्यासाठी कलाकारांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे.त्यासाठी सुसज्ज असे बंदिस्त नाट्यगृह होण्याची गरज आहे.