Sun, Apr 21, 2019 04:42होमपेज › Konkan › ‘कोकण’च नंबर १

‘कोकण’च नंबर १

Published On: Jun 09 2018 1:35AM | Last Updated: Jun 08 2018 10:34PMरत्नागिरी : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा कोकण विभागीय मंडळाने 96 टक्क्यांसह राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. कोकण विभागातून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. स्थापनेपासून राज्यात सलग प्रथम येण्याची परंपरा मंडळाने या वर्षीदेखील कायम राखली असल्याचे मंडळाचे प्रभारी अध्यक्ष रमेश गिरी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

या परीक्षेसाठी कोकण विभागातून एकूण 37 हजार 706 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 37 हजार 679 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 36 हजार 171 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये रत्नागिरीतील 12 हजार 503 मुले आणि 11 हजार 939 मुली उत्तीर्ण झाल्या असून, रत्नागिरीची उत्तीर्ण टक्केवारी 95.51 आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 6157 मुले, तर 5 हजार 572 मुली उत्तीर्ण झाल्या असून, या जिल्ह्याची उत्तीर्णतेची टक्केवारी 97.04 एवढी आहे. या परीक्षेसाठी दोन्ही जिल्ह्यांतून 19 हजार 574 मुले तर 18 हजार 105 मुली प्रविष्ट झाल्या होत्या. मुलांची उत्तीर्ण संख्या 18 हजार 660 असून, त्याची टक्केवारी 95.33 एवढी आहे. मुलींची उत्तीर्ण संख्या 17 हजार 511 असून, त्याची टक्केवारी 96.72 एवढी आहे. म्हणजेच मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत 1.39 एवढे जास्त आहे.

या विभागात रत्नागिरीत 401 आणि सिंधुदुर्गात 226 अशा 627 शाळा असून, या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरीत 72 आणि सिंधुदुर्गात 41 अशी 113 परीक्षा केंद्रे होती. प्रमुख विषयांचा मराठी 97.00, इंग्रजी 99.27, हिंदी 97.02, गणित 95.96, विज्ञान 97.92 आणि इतिहास भुगोलचा निकाल 98.41टक्के लागला. याविभागात एकूण 249 शाळांचा निकाल 100 टक्के लागला. विशेष म्हणजे यंदा एकही निकाल राखीव नाही.

दुर्गम व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना नजीकचे केंद्र मिळावे या उद्देशाने सिंधुदुर्गमध्ये मुठाद आणि रत्नागिरीत वरवडे येथे नवी परीक्षा केंद्रे स्थापित करण्यात आली होती. सर्व विषयांच्या मुख्य नियमकांची एकत्रित सभा प्रथमच कोकण विभागीय मंडळात घेऊन मूल्यमापनाचे काम योग्य व बिनचूक होण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या.

चिपळूणची भाग्यश्री यादव पहिली...

चिपळूण शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी भाग्यश्री यादव हिने 100 टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला. जिद्द, चिकाटी, अभ्यासू वृत्ती, पालक आणि शिक्षकांचे मार्गदर्शन याच्या जोरावर हे यश पटकावल्याचे भाग्यश्रीने सांगितले.