Wed, Jul 24, 2019 05:50होमपेज › Konkan › कोकण बोर्ड सातव्यांदा अव्वल

कोकण बोर्ड सातव्यांदा अव्वल

Published On: May 31 2018 1:39AM | Last Updated: May 31 2018 12:09AMरत्नागिरी : प्रतिनिधी

यावर्षी राज्यातील 9 विभागीय मंडळांमध्ये कोकण मंडळाचा सर्वाधिक 94.85 टक्के निकाल लागला़  कोकण मंडळाने सलग 7 व्या वर्षी राज्यात अव्वल येण्याची परंपरा कायम राखली आहे़  या मंडळात यावर्षीदेखील मुलांच्या तुलनेने मुलींनी बाजी मारली. विद्यार्थ्यांना दि. 12 रोजी दुपारी तीन वाजता कनिष्ठ महाविद्यालयात गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे.

बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल बुधवार दि. 30 रोजी दु़ 1 वा़  जाहीर झाला़   यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत कोकण विभागीय मंडळाच्या सहसचिव भावना राजनोर यांनी माहिती दिली़ यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर उपस्थित होते़

कोकण विभागीय मंडळाचा एकूण निकाल 94.85 टक्के एवढा लागला़ या परीक्षेसाठी कोकण मंडळामध्ये एकूण 33 हजार 39 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते़  त्यामध्ये 16 हजार 979 मुले, तर 16 हजार 60 मुलींचा समावेश आहे. त्यांपैकी 31 हजार 336 विद्यार्थी उत्तीर्ण झाले़   मुलांची उत्तीर्णतेची संख्या 15 हजार 737 असून, त्यांचे शेकडा प्रमाण 92.69 टक्के आहे़  मुलींची उत्तीर्णतेची संख्या 15 हजार 599 असून त्यांचे शेकडा प्रमाण 97.13 टक्के आहे़  मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेने 4.44 टक्के इतके अधिक आहे़

शाखानिहाय निकाला विज्ञानचा 97.96, वाणिज्यचा 97.57, ‘एमसीव्हीसी’चा 91.08 तर कला शाखेचा 88.42 टक्के निकाल लागला आहे. प्रमुख विषयांच्या निकालामध्ये रसायनशास्त्राचा निकाल सर्वाधिक म्हणजे 99.45 टक्के एवढा लागला असून, त्याखालोखाल मराठी 99.35, जीवशास्त्र 99.26, भौतिकशास्त्र 98.73, हिंदी 98.48, अकौटन्सी 98.32, अर्थशास्त्र 97.48, गणित 97.35 तर सर्वाधिक कमी म्हणजेच 95.20 टक्के निकाल इंग्रजी विषयाचा लागला आहे़

सिंधुदुर्ग जिल्ह्याने यावर्षी 96 टक्के निकाल देऊन, राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे़ या जिल्ह्यात एकूण 11 हजार 619 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते़  त्यांपैकी 11 हजार 154 विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ यामध्ये 
5 हजार 530 मुले, तर 5 हजार 624 मुलींचा समावेश आहे़ मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 97.84 टक्के असून, मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 94.19 टक्के आहे़ या जिल्ह्यात एकूण 96 कनिष्ठ महाविद्यालय असून, 23 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती़

रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 94.22 टक्के लागला असून, जिल्ह्यातून एकूण 21 हजार 420 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते़ त्यापैकी 20 हजार 182 विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ यामध्ये 10 हजार 207 मुले, तर 9 हजार 975 मुलींचा समावेश आहे़ मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 96.73 टक्के असून, मुलांची 91.89 टक्के एवढी आहे़ 

निकालाच्या ठळक वैशिष्ट्यांबाबत बोलताना सहसचिव भावना राजनोर यांनी सांगितले की, यावर्षी दुर्गम व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना नजीकचे केंद्र मिळण्याच्या उद्देशाने दोन नवीन केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती़ कॉपीमुक्त अभियानाकरिता जिल्हास्तरावर सभा आयोजित करून मार्गदर्शन करण्यात आले़ तणावविरहीत व कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होण्याकरिता प्रत्येक शाळेत विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या संयुक्त मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते़  विभागीय मंडळातून दोन्ही जिल्ह्यांत प्रत्येकी 9 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती़ भरारी पथकांना केंद्र भेटीबाबतचे दररोजचे नियोजन देण्यात आले होते़

स्थापनेपासून प्रथम येण्याची परंपरा
कोकण विभागीय मंडळाच्या स्थापनेपासून मंडळाने बारावीच्या परीक्षेत सलग सातवेळा राज्यात अव्वल स्थान कायम राखले आहे़  सन 2012 मध्ये कोकण विभागीय मंडळाची स्थापना झाली़ तेव्हापासून आतापर्यंतच्या निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे - सन 2012 - 86.25 टक्के, 2013 - 85.88 टक्के, 2014 - 94.85 टक्के, 2015 - 95.68 टक्के, 2016 - 93.29 टक्के, 2017 - 95.20 टक्के, 2018 - 94.85 टक्के.