Wed, Apr 24, 2019 15:29होमपेज › Konkan › कोकण कृषी पर्यटनाला चालना मिळणार

कोकण कृषी पर्यटनाला चालना मिळणार

Published On: Feb 10 2018 11:17PM | Last Updated: Feb 10 2018 11:04PMरत्नागिरी : प्रतिनिधी

कोकणातील कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र कृषी पर्यटन धोरण राबविण्यात येणार आहे. ग्रामीण पर्यटन, ग्रामीण रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार शेतकर्‍यांना पर्यटन व्यवसायाकडे प्रोत्साहित करण्यासाठी काही सवलती देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक एस. एस. जगताप यांनी दिली.

कोकणाच्या पर्यटन क्षेत्राबरोबरच कृषी पर्यटनातही रोजगाराच्या अनेक संधी लक्षात घेऊन या कृषी पर्यटन धोरणांची अंंमलबाजावणी करण्यात येणार आहे. या धोरणानुसार कृषी पर्यटन व्यवसायास शेतीपूरक व्यवसाय म्हणून मान्यता देण्यात येणार आहे.  

कृषी विभागाच्या योजना या कृषी पर्यटन केंद्रांना मंजूर करण्यात येणार आहे. कृषी पर्यटन केंद्र उपक्रमासाठी शेतजमिनीचा उपयोग किंवा वापर करण्यासाठी अकृषक (एनए) वापर परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. कृषी पर्यटन केंद्र सुरू केल्यानंतर त्याची रितसर नोंद सात-बारा तसेच ‘आठ-अ’वर तलाठ्यामार्फत करण्यात येणार आहे. वीज, पाणी इत्यादी सुविधा शेतीच्या दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  

कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी सहकारी तसेच राष्ट्रीयीकृत बँकांकडून अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार आहे. कृषी पर्यटन केंद्रांवर पर्यटकांना सोयी-सुविधांसाठी केल्या जाणार्‍या बांधकामास (राहण्याच्या खोल्या इत्यादी) अकृषक प्रमाणपत्र घेण्याची अट राहणार नाही. त्याची घरपट्टी घरगुती दराने आकारण्यात येणार असून सेवाकर, व्यवसाय कर, करमणूक कर इत्यादी करांपासून सवलत देण्यात येणार आहे.