होमपेज › Konkan › सेंसरद्वारे होणार कोकणातील सागरतळाचा अभ्यास

सेंसरद्वारे होणार कोकणातील सागरतळाचा अभ्यास

Published On: Jan 27 2018 11:22PM | Last Updated: Jan 27 2018 11:22PMरत्नागिरी :  प्रतिनिधी

स्वयंचलित हवामान केंद्राप्रमाणे सागराच्या तळाशी भूपृष्ठीय घडामोडींमुळे होणारी स्थित्यंतरे    तपासण्यासाठी कोकण किनारपट्टीचा अभ्यास आता स्वयंचलित सेन्सरद्वारे  करण्यात येणार आहे. यासाठी इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस (इन्कॉईस) तर्फे  कोकणातील सागरी भूपृष्ठाचा  अभ्यास करण्यासाठी मुंबईत सागरी भागात ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

कोकण किनारपट्टी भागात अलीकडेच घोंगावत धुमाकूळ घातलेल्या ओखी वादळासारखी नैसर्गिक आपत्ती, मध्यंतरी सागरी भागात झालेले लाल पाणी तसेच सागरी भूपृष्ठात होणार्‍या हालचालींमुळे लोकवस्ती असलेल्या भूभागावर होणारे परिणाम तपासण्यासाठी सागराच्या पाण्याचे नमुने तपासण्याची पद्धत सागरी अभ्यासात  रुढ होती. मात्र, आता  स्वयंचलित सेन्सरद्वारे ही तपासणी करण्यात येणार आहे.

यासाठी राज्याला लाभलेल्या 720 कि. मी. म्हणजे संपूर्ण कोकण किनारपट्टीचा या सेन्सरद्वारे अभ्यास करण्यात येणार आहे. यासाठी मुंबईच्या सागर तळाशी याचे केंद्र प्रस्थापित करण्यात येणार आहे. त्यासाठी एक तरंगता बोया या भागात ठेवला जाणार आहे. या तरंगत्या बोयाच्या तळाला गेलेल्या भागाला सेंसर आणि स्वंयचलित कॅमेरा बसविण्यात येणार आहे. या सेन्सरद्वारे सागरतळात होणार्‍या सुमारे 500 कि.मी. परिघातील  हालचाली टिपण्यात येणार आहेत. त्यानुसार सेन्सरने दिलेली परिमाणांनी (रीडिंग) सागराच्या तळात होणार्‍या उलथापालथीचा अभ्यास करण्यात येणार आहे. ‘इन्कॉईस’द्वारे अशा प्रकारचा सागर तळाचा अभ्यास देशातील 7 भागांमध्ये करण्यात   येणार असून त्यांपैकी कोकणासाठी त्याचे केंद्र मुंबईत निवडण्यात  आले आहे