Mon, Jun 17, 2019 04:11होमपेज › Konkan › कोकण रेल्वे प्रशासनाकडून मुंबई, पुणे, कोल्हापूर, पणजी येथे व्यवस्था

कोकणातील विद्यार्थ्यांची परीक्षा विदर्भात नाही

Published On: Jul 03 2018 1:52AM | Last Updated: Jul 02 2018 11:21PMरत्नागिरी : प्रतिनिधी 

कोकण रेल्वेची रेल्वेकडून घेण्यात येणारी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असून कोकणातील विद्यार्थ्यांसाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर व पणजी या ठिकाणी परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोकण रेल्वेतील स्टेशन मास्तर, गुड्स गार्ड, अकाऊंट असिस्टंट व सीनिअर क्लार्क या पदांच्या भरतीसाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनकडून परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेबाबत होत असलेल्या आरोपांमुळे ही परीक्षा ऑनलाईन व इनकॅमेरा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, कोकणामध्ये तांत्रिक अडचणी असल्याने येथे परीक्षा घेणे शक्य नव्हते. या परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या क्षमतेचे सर्व्हर उपलब्ध होत नसल्याने ही परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर व पणजी या ठिकाणी घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. मात्र, उमेदवारांची संख्या 7 हजार 400 पेक्षा अधिक असल्याने त्यांची सोय या ठिकाणी होऊ शकली नाही.

त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रकल्पग्रस्त व स्थानिकांसाठी जवळच्या केंद्रांवर सुविधा केली. उर्वरित उमेदवारांसाठी विदर्भ वगैरे परिसरात परीक्षा केंद्रे निश्‍चित करण्यात आली. मात्र, काहीजणांनी कोकणातील विद्यार्थ्यांना विदर्भात जावे लागेल, असे खोडसाळ आरोप केले. रेल्वे प्रशासनाने एखाद्या व्यक्तीचे असे नाव गेले असल्यास ते मुंबई, पुणे, कोल्हापूर आदी ठिकाणी बदलून देण्यात येईल, अशी भूमिका घेतली आहे.

कोकण रेल्वेने आतापर्यंत 50 टक्क्यांहून अधिक प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिली आहे. प्रकल्पग्रस्त व स्थानिक असे 92 टक्के कर्मचारी रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. केवळ आठ टक्के कर्मचारी अन्य राज्यातील आहेत. असे असताना कोकण रेल्वेबाबत खोडसाळ आरोप होत असल्याचे रेल्वेच्या एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने सांगितले. कोकणात परीक्षेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने येथे परीक्षा केंद्रे देता आलेली नाहीत. कोकणातील एकाही व्यक्तीला दूर परीक्षेला जावे लागणार नाही, अशी कोकण रेल्वेची भूमिका असून ज्या उमेदवारांना दूरची परीक्षा केंद्रे मिळाली आहेत त्यांनी रेल्वेच्या बेलापूर कार्यालयात संपर्क साधून परीक्षा केंद्राविषयी आपले म्हणणे मांडावे, असे आवाहनही रेल्वेकडून करण्यात आले आहे.