होमपेज › Konkan › ‘पदवीधर’साठीही ताकदीने उतरणार

‘पदवीधर’साठीही ताकदीने उतरणार

Published On: May 28 2018 1:41AM | Last Updated: May 27 2018 8:21PMरोहा :  प्रतिनिधी

ना. अनंत गीते यांनी कोकण स्थानिक स्वराज्य  संस्था  निवडणुकीत दलबदलू उमेदवार पुढे आणल्याने हा उमेदवारच निष्ठावान शिवसैनिकांना रुचलेला नव्हता. त्यामुळेच शिवसेनेतील सूज्ञ मतदारांनी अनिकेत तटकरे यांना मतदान करून गीतेंना धडाच शिकविल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी सांगितले. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अनिकेत तटकरे यांच्या विजयाच्या पार्श्‍वभूमीवर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. या निवडणुकीपाठोपाठ कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी संपूर्ण ताकतीनिशी उतरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ज्ञात अज्ञात शक्‍तींसह निष्ठावंत शिवसैनिकांनी दिलेल्या आशीर्वादामुळे अनिकेतला देदीप्यमान यश मिळाले, असे सांगत शिवसेनेची मते राष्ट्रवादीच्या पारड्यात पडली, यावर सुनील तटकरे यांनी शिक्कामोर्तब केले.

तटकरे यांनी गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादीला मदत करणार्‍या शेकाप, काँग्रेस, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, मनसे यांचे आभार व्यक्‍त करीत त्यांनी ज्ञात अज्ञात शक्‍तींसह निष्ठावंत शिवसैनिकांचे विशेष आभार मानले. आणि शिवसेनेच्या गोटातूनही मतदान झाल्याच्या वृत्ताला त्यांनी अधिकृत दुजेरा दिला. दलबदलू उमेदवार ना. गीतेंनी पुढे आणल्याने हा उमेदवारच निष्ठावान शिवसैनिकांना रुचलेला नव्हता. त्यामुळेच शिवसेनेतील सूज्ञ मतदारांनी अनिकेतला मतदान करून गीतेंना एकप्रकारे धडा शिकवल्याचे तटकरे यावेळी म्हणाले. गीतेंचा हा निर्णय त्यांच्या अंगलट आला, असे सांगून ते पुढे म्हणाले की, ना गीतेंनी राजीव साबळेंचा बळी दिला आहे. या निवडणुकीत प्रतिकूल वातावरण होते. अशा वातावरणात ज्ञात -अज्ञात शक्‍ती तसेच निष्ठावंत शिवसैनिक यांनी  राष्ट्रवादीच्या विजयासाठी हातभार लावल्याचे ते म्हणले.

भाजपच्या सहकार्याबाबत त्यांना छेडलं असता ज्ञात अज्ञात शक्‍तींमध्ये भाजपचाही हातभार असू शकतो, असे सांगून या निवडणुकीत सर्वच पक्ष राष्ट्रवादीबरोबर असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितले. पालघर पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यावर सर्वच ठिकाणी भाजपने विरोधाची भूमिका घेतली होती. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेशी फारकत घेत राष्ट्रवादीला मदत केल्याचे स्पष्ट केले. 

दरम्यान, निरंजन डावखरे यांनी घेतलेला निर्णय हा दुर्दैवी असल्याचे सांगत आता कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी संपूर्ण ताकतीनिशी उतरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.