होमपेज › Konkan › मतदार सेना सदस्य जाणार अज्ञातवासात

मतदार सेना सदस्य जाणार अज्ञातवासात

Published On: May 15 2018 10:43PM | Last Updated: May 15 2018 10:43PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी नगरपरिषदेतील शिवसेनेचे सत्ताधारी नगरसेवक व पदाधिकारी बुधवारपासून अज्ञातवासात जात आहेत. मतदानाच्या दिवशी 21 मे रोजी रत्नागिरीत परतण्यापर्यंत स्वच्छता आणि पाणीपुरवठ्याचा गोंधळ उडू देऊ नय, अशा सक्त सूचना नगराध्यक्ष राहुल पंडित आणि सहकारी नगरसेवकांनी संबंधित पाणी आणि आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या आहेत.

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार निवडणुकीचे 21 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे उमेदवार अ‍ॅड. राजीव साबळे यांना दगाफटका होऊ नये यासाठी मतदार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सेना सदस्यांना केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी अज्ञातवासात जाण्याची यापूर्वीच कल्पना दिली आहे. त्यानुुसार शिवसेनेचे मतदार असलेले सर्व सदस्यांना बुधवारी अज्ञातवासात नेले जाणार आहे.

अज्ञातवासात जाणारी ही सर्व मंडळी 21 मे रोजी मतदानाच्या दिवशी परतणार आहेत. तोपर्यंत पाणी आणि स्वच्छतेची गडबड झाली तर प्रतिमा डागळण्याची भीती आहे. या पार्श्‍वभूमीवर नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी मुख्याधिकार्‍यांसह पाणी आणि स्वच्छता विभागाच्या अधिकार्‍यांची मंगळवारी बैठक घेतली. यावेळी शिवसेना नगरसेवक आणि इतर पदाधिकार्‍यांसह मुख्याधिकारी अरविंद माळी उपस्थित होते.