Thu, Jul 18, 2019 02:41होमपेज › Konkan › ‘पदवीधर’चे पडघम; कही खुशी-कही गम

‘पदवीधर’चे पडघम; कही खुशी-कही गम

Published On: May 28 2018 1:41AM | Last Updated: May 27 2018 9:57PMरत्नागिरी : शहर वार्ताहर

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली असून इच्छुकांच्या नावांची चर्चाही सुरू झाली आहे. अनेक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून असल्यामुळे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीमध्ये रस्सीखेच आहे. भाजपामध्ये निरंजन डावखरेंनी प्रवेश केल्यामुळे आणि त्यांना उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट झाल्याने निष्ठावंतांचा हिरमोड झाला आहे. दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडी उमेदवाराच्या शोधात आहे. भाजपमधील नाराजांना आपल्या गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असून नक्की कोण कोणाच्या गळाला लागणार, हे अल्पावधीतच स्पष्ट होणार आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 25 जून रोजी होणार असल्याने सर्वपक्षीय इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकताच भाजपकडून त्यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. त्यामुळे भाजपमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले असून शिवसेनेने देखील रणनीती बदण्याचा निर्णय घेतला आहे. 

विजयाची राजकीय गणिते लक्षात घेऊन डावखरे यांनी कमळाला पसंती दिली. त्यांचा नुकताच पक्ष प्रवेश आणि त्याच क्षणी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाण्यातील काही आजी-माजी नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त करीत पक्षनिष्ठेला डावलले जात असल्याची भावना व्यक्त केल्या.  आतापर्यंत डोंबिवली, ठाण्याला कोकणाचे नेतृत्व करण्याची संधी मिळालेली आहे. कोकण पदवीधर मतदार संघाचे नेतृत्व डोंबिवलीचे वसंतराव पटर्वधन, डॉ. अशोक मोडक  आणि ठाण्याचे संजय केळकर, निरंजन डावखरे यांनी केलेले आहे.  आतापर्यंत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील कोणालाच संधी मिळालेली नाही. शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा ठाणेकर असलेल्या डावखरे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्याने कोकणातील भाजपमधील इच्छूकांमध्ये नाराजी पसरली आहे.

माजी आमदार बाळ माने, माजी आमदार विनय नातू,  माजी आमदार प्रमोद जठार, चेतन पाटील आणि ठाण्यातील भाजपचे शहर अध्यक्ष संदीप लेले हे इच्छूक होते. या सर्वांना डावलण्यात आल्याने भाजपामधील नाराजीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न सेना आणि राष्ट्रवादी आघाडीकडून होण्याची शक्यता आहे. संदीप लेले यांनी तर पदवीधरांची मोट बांधताना मतदार अर्ज भरूनही घेतले होते. रत्नागिरीतून बाळ माने, विनय नातू यांनीही मतदार नोंदणी करून घेतली आहे. सर्वाधिक परिश्रम भाजपकडून संदीप लेले यांनी घेतले आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता दाट होती. मात्र निरंजन डावखरे यांना पक्षात घेवून उमेदवारी दिल्याने लेले-माने-नातू यांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे.
शिवसेना,  राष्ट्रवादी आघाडी यांच्याकडून उमेदवार जाहिर झालेले नाहीत.

तरीही आदित्य ठाकरे यांनी पत्रव्यवहार करून मतदारांची मने वळविण्यास सुरूवात केलेली आहे. राष्ट्रवादी आघाडीकडून शांतता आहे. त्यातच भाजपमध्ये नाराजी असल्याचा फायदा उचलण्याचे मनसुबे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे उमेदवार आयत्यावेळेला जाहिर करून मैदान मारायचे संकेत शिवसेनेच्या विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळत आहेत.  राष्ट्रवादी आघाडी आपला उमेदवार जाहिर करण्यास वेळ घेत आहे. सध्या डावखरे हा भाजपचा आयात चेहरा पुढे आला  आहे. डावखरे यांनी याआधी आमदार झाल्यावर ठोस अशी पदवीधरांची कामे केलेली नाहीत.

पदवीधरांच्या प्रश्‍नांवर आवाजच उठवलेला नाही. त्यांचा ठाणे सोडल्यास रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनसंपर्कही कमी झाला होता. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. डावखरे यांच्याबाबत आधीच नाराजी त्यात त्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने आयतीच उमेदवारी मिळाली. त्यामुळे भाजपचे निष्ठावान नाराज आहेत. त्यामुळे डावखरेंचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. याचा फायदा उचलण्याचे शिवसेनेने ठरवले असून नाराजांची मोट बांधून शिवसेनेचा उमेदवार विधानपरिषदेत धाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून उमेदवारी जाहीर करण्यात दिरंगाई होत असल्याचे पुढे आले आहे.

महाराष्ट्र स्वाभिमानमुळे गणित बदलणार?

आता मतदारांची संख्या 90 हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे पहिल्या पसंतीची मते मिळविणे कष्टाचे बनले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याची मते ज्याच्या पारड्यात पडणार त्यावर जिंकण्याचे गणित ठरणार आहे. यासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी शिवसेनेने काबीज करण्यास सुरूवात केली आहे. डावखरेंची मदार ठाण्यावर असणार आहे, तर राष्ट्रवादीची मदार रायगडवर आहे. त्यातच नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने उमेदवार रिंगणात उतरवला तर राजकीय गणिते बदलणार आहेत.