होमपेज › Konkan › कोकणवासीयांना सावधान राहण्याचा राज ठाकरेंचा सल्ला

जमीन हातातून गेली की अस्तित्व संपले!

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 08 2018 11:23PMमुंबई : प्रतिनिधी

विध्वसंक प्रकल्प कोकणात आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत आणि तुमच्या जमिनी बळकावण्याचे परप्रांतीयांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे बाकीचे इथे घुसत आहेत. आमचे लोक जमिनी विकून मोकळे होत आहेत. एकदा जमीन हातातून गेली की तुमचे अस्तित्व संपले. तुम्हाला कोणीही विचारणार नाही. त्यामुळे तुम्ही सावधान राहा, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी शनिवारी येथे दिला आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने रवींद्र नाट्य मंदिरात मुंबई, ठाणे व पालघर येथील मनसे कार्यकर्त्यांचा ‘कोकणवासियांचा मेळावा’आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज ठाकरे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आंबेनळी दुर्घटनेतील बळींना श्रद्धांजली वाहण्यात आली. कोकणात कोट्यवधींचे रस्ते बांधल्यानंतर काही दिवसातच खड्डे पडतात कसे, असा सवाल करीत रस्त्यांवर खड्डे पडल्यानंतर कंत्राटदारांना मनसे स्टाईलने जाब विचारा, असे आदेशही राज यांनी कार्यकर्त्यांना दिले. 

कोकणला लाभलेल्या सागरी किनारपट्ट्ीचा उल्लेख करीत राज ठाकरे म्हणाले, सागरी किनार पट्ट्ीवर लक्ष ठेवा असे छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापुर्वी सांगितले. मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष केले. म्हणून 1993 मुंबईत बॉम्बस्फोट घडवणारे दहशतवादी याच मार्गाने आले. त्यामुळे महाराज्यांना पदस्पर्शाने पावन झालेल्या या भुमिकडे तुम्हाला लक्ष द्यावेच लागेल, असे त्यांनी कार्यकत्यांना बजावले.

कोकणची भूमी हे केरळसारखीच आहे. पर्यटनात केरळच पुढे जाऊ शकतो, मग आपले कोकण का नाही? पण हा विचार करतच नाही. या गोष्टी करण्यासाठी राजकीय बळ लागते, असंही राज ठाकरे यांनी सुनावले. या भूमीने आतापर्यंत काय काय दिले, असा सवाल करीत राज ठाकरे म्हणाले, पा. वा. काणे, धोंडू केशव कर्वे, विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, भीमसेन जोशी आणि जे आर डी टाटा महाराष्ट्रातल्या या मान्यवरांना भारतरत्न मिळाला आहे. त्यापैकी एकट्या दापोली तालुक्यात चार भारतरत्न आहेत. ज्या कोकणाने भारताला इतकी महान माणसे दिली आणि आम्ही फक्त गणपतीला गावाला जाऊन येतोय’. त्यामुळे गावाकडे लक्ष द्या, इतर पक्षाच्या लोकांसारखे वागलेले मला अजिबात चालणार नाही.

मुंबई-गोवा हायवेवरील 

अवस्थेवरुन राज ठाकरे म्हणाले की, कोकणात नवीन रस्ते बांधले आहेत म्हणे. जेवढे नवीन रस्ते बांधले ते उखडले आहेत. गणपतीला गावाला जाताना तुमच्या मणक्यांना कळेलच ते. आज हजारो रुपये कोटी खर्च केला जातोय. आपण कुठे रस्ते बांधतोय, याचं भान नाही. फक्त पैसे खर्च केले जातात. रस्ते बांधले जात आहते. पाऊस पडला, दरडी कोसळल्या की आमचे रस्ते खराब होतात, खड्डे पडायला सुरुवात होते. या रस्त्यांचे कंत्राटदार कोण आहे, याचा जाब तुम्ही आपल्या पद्धतीने विचारायला हवा, असेही राज ठाकरे म्हणाले.

शहरी भागांप्रमाणे ग्रामीण भागातील मनसे कार्यकर्त्यांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक गावातील मनसैनिकांना बळ देण्याचं काम मुंबईतील कार्यकर्त्यांनी करायला हवे. प्रत्येक गावात मनसेची शाखा निर्माण झाली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. पक्ष स्थापन झाल्यानंतर पहिले यश कोकणातून मिळाले. यापुढेही मिळणार आहे.त्याची सुरुवातही कोकणातून होईल, अशी अपेक्षा राज यानी व्यक्त केली.