होमपेज › Konkan › ‘रिफायनरी’बाबत राज ठाकरेंच्या भूमिकेेकडे लक्ष

‘रिफायनरी’बाबत राज ठाकरेंच्या भूमिकेेकडे लक्ष

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 12 2018 10:27PM

बुकमार्क करा
राजापूर : प्रतिनिधी

रिफायनरी प्रकल्पावरून विरोधाची लाट निर्माण झाली असतानाच अद्यापपर्यंत या प्रकल्पाबाबत कोणतीच भूमिका जाहीर  न करणारे ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी प्रकल्पस्थळाला भेट देणार असून ते तेथील जनतेशी संवाद साधणार आहेत. आजवर विकासालाच प्राधान्य देणारे ‘मनसे’ अध्यक्ष यावेळी रिफायनरीबाबत कोणती भूमिका घेतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .

शनिवारी ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे हे नाणार प्रकल्प परिसराचा दौरा करणार असून प्रखर विरोध करणार्‍या जनतेशी संवाद साधणार आहेत. केंद्र व राज्याची भागीदारी असलेला रिफायनरी प्रकल्प कोकणवासीयांच्या माथी मारण्यात आला आहे. त्याला स्थानिक जनतेचा मोठा विरोध आहे. त्यांना अभेद्य साथ देताना शिवसेना, दोन्ही काँग्रेससह नारायण राणेंचा स्वाभिमान पक्षदेखील प्रकल्पाच्या विरोधात उभे ठाकला आहे.

मात्र, ‘मनसे’ची भूमिका स्पष्ट झालेली नाही. काही दिवसांपूर्वी ‘मनसे’चे नेते व  माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी सागवे-नाणार परिसराचा दौरा केला होता. समस्त प्रकल्प विरोधकांनी प्रकल्पाला नक्‍की विरोध कशासाठी केला आहे. त्याची माहिती घेतली होती. एखादा प्रकल्प शासन लादत असेल तर त्याला विरोध असेल, असे ‘मनसे’च्या नेत्यांनी यावेळी सांगितले होते. त्या पार्श्‍वभूमीवर ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे राजापूर दौर्‍यावर येत असून ते येथील प्रकल्प विरोधकांशी संवाद साधणार आहेत.

त्यानंतर राज ठाकरे कोणती भूमिका जाहीर करतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राज ठाकरे यांच्या कोकण दौर्‍यामुळे मनसैनिकांत जबरदस्त उत्साह संचारला आहे.