Mon, May 27, 2019 09:36होमपेज › Konkan › कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ हवेच!

कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ हवेच!

Published On: Feb 12 2018 1:58AM | Last Updated: Feb 11 2018 8:11PMचिपळूण : खास प्रतिनिधी

अवघ्या 36 महाविद्यालयांसाठी सोलापूर जिल्ह्याला स्वतंत्र विद्यापीठ मिळते. मग कोकणातील 103 महाविद्यालयांसाठी स्वतंत्र विद्यापीठ का दिले जात नाही? रत्नागिरीतील मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र केवळ नावालाच आहे. त्यामुळे कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ हवेच, असा निर्धार चिपळुणातील लोकप्रतिनिधी, संस्थाचालक व विद्यार्थ्यांच्या बैठकीत करण्यात आला. कोकणातील सर्व आमदारांनी या मुद्यावर एकत्र येण्याचे ठरले.

शहरातील डी. बी. जे. महाविद्यालयात कोकण विद्यापीठासाठी शनिवारी सायंकाळी निर्धार सभा झाली. यावेळी आ. सदानंद चव्हाण, आ. राजन साळवी, माजी आमदार बापू खेडेकर, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे सदानंद भागवत,  नवकोकण एज्युकेशन सोसायटी नियामक समितीचे अध्यक्ष बाबू तांबे, प्रा. आबा सावंत, विनोद दळवी, जावेद ठाकूर, सुधीर दाभोळकर, मंदार महाविद्यालयाचे प्रा. रंगोटे, अशोक कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आ. राजन साळवी यांनी विधीमंडळामध्ये स्वतंत्र विद्यापीठासाठी येत्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडू व या विषयावर चर्चा घडवून आणू, असे सांगितले. आ. सदानंद चव्हाण यांनीदेखील याबाबत आपण पुढाकार घेऊ, असे सूतोवाच केले. यावेळी कोकण विद्यापीठाच्या मागणीसाठी पुढाकार घेणारे अ‍ॅड. विलास पाटणे यांनी स्वतंत्र कोकण विद्यापीठाची आवश्यकता का आहे याचे विवेचन केले. सध्या मुंबई विद्यापीठाकडे तब्बल 762 महाविद्यालयांचा कारभार आहे. या विद्यापीठाला हा व्याप सांभाळणे अवघड झाले आहे. यातूनच अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रायगडसाठी स्वतंत्र विद्यापीठ झाले तर येथील विद्यार्थ्यांचा प्रवास, वेळ आणि खर्च वाचेल. यामुळे स्वतंत्र कोकण विद्यापीठ होणे काळाची गरज आहे, असे सांगितले. आ. साळवी यांनी या बाबत विधीमंडळात अशासकीय ठराव मांडला गेला होता. या विषयावर चर्चादेखील घडवून आणली होती.  या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याबाबत तातडीची बैठक घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी सूचना केली होती. मात्र, अद्याप काहीच झालेले नाही. 

नवनिर्माणचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये म्हणाले, सुरुवातीला आपण मुंबई विद्यापीठात रहावे, अशा मानसिकतेत होतो. पण मुंबई विद्यापीठाचे पेपर तपासणीसाठी नागपूरला जात असतील तर उपयोग काय? त्यामुळे हे विद्यापीठ कोण चालवतेय याबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे. येथील मातीशी मिळतेजुळते अभ्यासक्रम तयार करून ते या विद्यापीठाच्या माध्यमातून राबविले गेले पाहिजेत. त्यासाठी स्वतंत्र कोकण विद्यापीठ गरजेचे आहे.

कोकणातील आमदारांनी हा प्रश्‍न विधीमंडळात  उचलून धरला तर नक्‍कीच त्याला यश येईल, असा विश्‍वास अ‍ॅड. पाटणे यांनी व्यक्‍त  केला. स्वतंत्र बोर्ड अस्तित्त्वात आले आणि गुणवत्तेत कोकण बोर्डच अव्वल ठरले. त्यामुळे कोकण विद्यापीठ देखील अव्वलच ठरेल, अशा भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्‍त केल्या. सदानंद भागवत यांनी, कोकण विद्यापीठासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन उभारावे, असे आवाहन केले. यावेळी सूचय रेडीज यांनी आभार मानले. प्रा. विनायक बांद्रे यांनी सूत्रसंचालन केले.

विद्यापीठासाठी जागेच्या आश्‍वासनाची आठवण

चिपळूणचे माजी आमदार आणि ज्येष्ठ पत्रकार स्व. निशिकांत उर्फ नाना जोशी यांनी आपल्या एका भाषणात उल्लेख करताना, कोकणसाठी जर स्वतंत्र विद्यापीठ होणार असेल तर आपण पुढाकार घेऊ आणि कोकणच्या मध्यवर्ती असणार्‍या चिपळूणमध्येच परशुराम भूमीत या विद्यापीठासाठी जागा देवू, असे म्हणाले होते. याची आठवण स्वतंत्र विद्यापीठासाठी झालेल्या निर्धार सभेत अनेकांनी काढली. यामुळे विद्यापीठासाठी लोकचळवळ उभारून असे विद्यापीठ व्हावे, याबाबत उपस्थितांनी निर्धार व्यक्‍त केला.