Mon, Mar 18, 2019 19:21होमपेज › Konkan › पदवीधर मतदारांमध्ये घट; प्रस्थापितांना दणका

पदवीधर मतदारांमध्ये घट; प्रस्थापितांना दणका

Published On: Jun 09 2018 11:35PM | Last Updated: Jun 09 2018 11:30PMरत्नागिरी : शहर वार्ताहर

कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तोंडावर आली आहे. ही निवडणूक येत्या 25 जून रोजी होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढत असून राष्ट्रवादीच्या मित्रपक्षांची आघाडी झाली आहे. त्यामुळे सध्यातरी हि निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता दिसत आहे. यावेळी पदवीधर मतदारांमध्ये तब्बल 13 हजारांनी  घट झाली असल्याने सर्वच पक्षांना विजयासाठीचे गणित सोपे असणार आहे. मात्र प्रस्थापितांना दणका बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

विविध राजकीय पक्षांनी या पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणी मोहिमेवर भर दिला होता. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मतदार नोंदणीसाठी मोठी मोहीम राबविली होती. परंतु, मतदारांमध्ये फारशी वाढ झाली नाही. उलट गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी 20 हजार मतदार घटले आहेत. पालघर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे कोकण पदवीधर मतदारसंघात येतात. सन 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघात 1 लाख 9 हजार मतदार नोंदणी झाली होती. आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 97 हजार इतकी मतदार नोंदणी झाली आहे. त्यामुळे सुमारे 13 हजारांनी पदवीधर मतदार संख्या घटली आहे. पदवीधर मतदारांमध्ये असलेला मतदानाविषयी निरुत्साह या माध्यमातून स्पष्ट झाला आहे.  

सन 1988 मध्ये कोकण पदवीधर मतदारसंघ अस्तित्वात आला. यावेळी केवळ सहा हजार मतदार नोंदणी झाली होती. त्यावेळी ठाणे येथील भाजपचे उमेदवार वसंत पटवर्धन विजयी झाले होते. 1994 साली या मतदारसंघात 12 हजार मतदार नोंदणी झाली. मतदार दुप्पट वाढले. त्यावेळी डॉ. अशोक मोडक आमदार म्हणून निवडून आले. सन 2006 साली तब्बल 66 हजार मतदार नोंदणी झाली. त्यावेळी भाजपचे संजय केळकर विजयी झाले. तर 2012 मध्ये पदवीधर मतदार वाढले त्यासाठी राष्ट्रवादीने जोर लावला आणि मतदार संख्या 1 लाख 10 हजारांवर गेली. यावेळी राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांना विजयी झाले. पारंपरिक भाजपकडे असलेला हा मतदारसंघ राष्ट्रवादीने आपल्याकडे खेचून आणला. 

आता जून 2018 मध्ये याच मतदारसंघात निवडणूक होत आहे. त्यामुळे सत्तेत असलेली भाजप पुन्हा एकदा हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राष्ट्रवादीने नजीब मुल्ला यांना संधी दिली आहे तर शिवसेनेने संजय मोरे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने राष्ट्रवादीतून आलेल्या निरंजन डावखरे यांना उभे केले आहे. त्यामुळे डावखरे यांची मते आणि भाजपची पूर्वांपार मते यामुळे डावखरेंना संधी जास्त आहे. त्यामानाने मुल्ला आणि मोरे हे कोकणवासीयांना नवखेच आहेत. डावखरे यांनी ज्याप्रकारे लोकसंपर्क वाढविला आहे, तो पाहता मुल्ला आणि मोरेंची अडचण आहे. मात्र मोरेंचा विचार करता युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रयत्न केले आहेत. भाजपकडूनही राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी ताकद लावली आहे. त्यात कोकणात मोदी फॅक्टरही नाकारून चालणार नाही. भाजपची रणनीती डावखरेंचा विजय सोपा करण्याची आहे. त्यामानाने भाजपची डोकेदुखी वाढविण्याचे आडाखे शिवसेनेचे आहेत. मात्र राष्ट्रवादी कुठेतरी कमी पडताना दिसत आहे. राष्ट्रवादीकडून आता प्रचाराला सुरूवात होत आहे. त्यामुळे ही निवडणूक सेना आणि भाजप अशी  थेट होण्याचीच शक्यता नाकारता येत नाही.  ही निवडणूक 25 जून रोजी होणार असून निवडणूक यंत्रणा कामाला लागली आहे. मतदारसंघात 94 मतदान केंद्रे आहेत.

निवडणुकीचे पडघम अन् पत्रांद्वारे प्रचार

कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आणि शुभेच्छापत्रे पाठवावीत, तशी उमेदवारांनी मतदारांना पत्र पाठविण्यास सुरूवात केली आहे. काही पत्रांमध्ये उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मात्र पत्रांमध्ये उमेदवार निवडून आल्यास काय करेल, याबाबत सुतोवाचही नसल्याने या पत्रांकडे मतदारही दुर्लक्ष करीत आहेत.